- संतोष स्वामी
दिंद्रूड (जि. बीड) : ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे वीस फूट खोल डोहात गटांगळ्या खाणाऱ्या पाच वर्षीय सैलू या मुलीस नऊ वर्षांच्या संविधानने पाण्यात उडी घेऊन वाचविले. धारु र तालुक्यातील चाटगाव परिसरात २५ जानेवारी रोजी ही घटना घडली. हे गाव आडवळणाला असल्यामुळे ही घटना १५ दिवसांनंतर समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतरही ना संविधानच्या शाळेने दखल घेतली ना की गावकऱ्यांनी, अशी खंत त्याच्या आई-वडिलांची व्यक्त केली.
चाटगाव शिवारात परळी-बीड-अहमदनगर रेल्वे लोहमार्गाचे काम सुरू असून या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदून मार्गाचे लेव्हल करण्यात आलेले आहे. अवकाळी पावसामुळे या खड्ड्यात २० ते २५ फूट पाणी साचले आहे. या डोहात २५ जानेवारी रोजी लोहमार्गाचे काम करणाऱ्या एका कामगाराची मुलगी सैलू रवी नेहावत (५ वर्षे) ही खेळत असताना पडली. यावेळी आसपास कोणीही नव्हते. आई-वडील मार्गाचे काम करीत होते. शेतात राहात असलेला संविधान दीपक गडसिंग (९) हा याचवेळी शाळेतून घराकडे परतत होता. त्यास ही मुलगी पाण्यात गटांगळ्या खात असताना दिसली. त्याने लगेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डोहात उडी घेतली आणि बुडत असलेल्या सैलूला डोहाबाहेर ओढत आणले.
चाटगाव शिवारातील स्वत:च्या शेतात गडसिंग कुटुंब राहते. संविधान हा गावातील जिल्हा परिषद प्रशालेत तिसऱ्या इयत्तेत शिक्षण घेतो. शेतातून दीड ते दोन कि.मी. पायपीट करत तो न चुकता दररोज शाळेत येत असल्याचे त्याचे वर्गशिक्षक सांगतात. त्याच्या शेतातील घराच्या परिसरात परळी-बीड- अहमदनगर लोहमार्ग गेल्याने तेथे काम करण्यासाठी तेलंगणा राज्यातून जवळपास २० ते २५ कुटुंब वास्तव्यास आहेत. या सर्व कुटुंबातील सदस्य लोहमार्गाच्या कामांत दिवसभर व्यस्त असतात. आज पंधरा दिवस लोटले तरी या धाडसाबाबत संविधानचे कुठेही कोडकौतुक न झाल्यामुळे संविधानच्या आई-वडिलांना याची खंत वाटते. तेथील सामाजिक कार्यकर्ते बाबा देशमाने यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
कठीणप्रसंगी प्रसंगावधान व धाडसी वृत्ती राखत केलेल्या कार्याबद्दल संविधान गडसिंगचे कौतुक वाटते. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. - डॉ. रमेश गटकळ, सामाजिक कार्यकर्ते
ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे, धाडस आहे. मात्र त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे असताना संविधान गडसिंगच्या धाडसाचे कौतुक करण्याचे धारिष्ट्य शाळेने दाखवले नाही, ही संताप आणणारी बाब आहे.- बाबा देशमाने, ग्रामस्थ, चाटगाव
मी व माझे कुटुंब शेतात राहतो. माझा मुलगा संविधान यास वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून चांगले पोहायला येते. तो नुसता पोहण्यातच तरबेज आहे, असे नाही तर तो शेतात विंचू, साप आदी सरपटणाऱ्या प्राण्यांना न भीता हुसकावून लावतो. त्याच्या या धाडसाची आम्हालाच कधीकधी भीती वाटते.- दीपक गडसिंग (संविधानचे वडील)