बीड : आतापर्यंत विविध क्लृप्त्या वापरून सायबर भामटे लोकांना गंडा घालत असल्याचे समोर आले आहे. मात्र, गेवराईच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना ना कोणाचा कॉल आला ना त्यांनी कोणाला ओटीपी शेअर केला. त्यांच्या खात्यातून भामट्याने दहा टप्प्यांत ५० हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार ३० जून रोजी उघडकीस आला.
डॉ. संजय रामराव कदम (रा. नवजीवन कॉलनी, बसस्थानकामागे, बीड) हे गेवराई येथे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. ३० जून रोजी ते दुपारी १२ वाजता ते शहरातील जिल्हा प्रशिक्षण संस्थेत होते. यावेळी त्यांच्या एसबीआयच्या खात्यातून ५ हजार रुपये कपात झाल्याचा संदेश प्राप्त झाला. अवघ्या काही मिनिटांत टप्प्याटप्प्याने १० वेळेस त्यांच्या खात्यातून प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये डेबिट झाले. यानंतर त्यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून फिर्याद दिली. अनोळखी व्यक्तीवर फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. तपास पो.नि. केतन राठोड करत आहेत.
बँकेने केले हात वरदरम्यान, ना कोणाला ओटीपी दिला ना कोण्या भामट्याचा फोन आला, तरीही खात्यातून ५० हजार रुपये गायब झाल्याने डॉ. संजय कदम चक्रावून गेले. त्यांनी एसबीआयच्या मुख्य शाखेत धाव घेत विचारपूस केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. बँकेने हात वर केल्याने ठेवींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे डॉ. कदम म्हणाले.
शिक्षकाच्या खात्यातून १९ हजार लांबविलेदुसऱ्या घटनेत १ जुलै रोजी धोंडराई (ता. गेवराई) जि.प. शाळेत शिक्षक असलेल्या लहू लक्ष्मण चव्हाण (रा. छत्रपती संभाजीनगर, पांगरी रोड, बीड) यांना ३० जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संतोष कुमार नावाच्या व्यक्तीने कॉल केला. क्रेडिट कार्ड बंद करण्याचा बहाणा करून १९ हजार ५६१ रुपयांना चुना लावला. चव्हाण यांना भामट्याने कॉल करून क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का, असे सांगितले. त्यांनी हो असे कळविल्यावर व्हिडीओ कॉल करून फोन - पे सुरू करायला लावून गोपनीय माहिती जाणून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चव्हाण यांनी शिवाजीनगर ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून संतोष कुमारविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.