पुरुषोत्तम करवा/
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांवरून कुरबुरी सुरू आहेत. नगराध्यक्ष शेख मंजूर यांनीे शुक्रवारी बोलाविलेल्या विशेष सभेत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आमदारांच्या दबावापुढे बारगळला.
माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात विकासकामांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. यामुळे नगराध्यक्षांनी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेत मुख्याधिकारी भोसले यांच्या कामाचे अवलोकन करून पुढील कामकाजाविषयी अवलोकन करण्यात येणार होते, त्याचबरोबर मालमत्ता कर मूल्यांकन व पाणीपट्टी व आर्य वैश्य व मराठा भवनाला जागा देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार होता.
मुख्याधिकारी भोसले यांच्यावर आपल्याच मर्जीतील नगराध्यक्षांकडून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आ. प्रकाश सोळंके यांनी मुख्याधिकारी भोसले यांची बाजू घेतली. नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यांसोबत राहण्याचे बजावल्याचे नगरसेवकांच्या गोटात चर्चा होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळीच मुख्याधिकारी भोसले यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास खात्याला पत्र पाठविले. या पत्रात त्यांनी नमूद केले की, ही बैठक शासनाच्या नियमाविरुद्ध असल्याने मी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. यानंतर एकाकी पडलेल्या नगराध्यक्षांवर ही बैठक रद्द करण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर काही नगरसेवकांनी आपल्या दालनात बसलेल्या मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्षांच्या दालनात बोलावून त्यांच्यावर नाराजी नसल्याचे दाखवत ऑनलाइन बैठक बोलावली. ११ वाजताची ऑफलाईन बैठक चार तासांनंतर तीन वाजता घेण्यात आली. यामुळे नगराध्यक्ष शेख यांचा मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास आणण्याचा प्रयत्न असफल ठरला.
......
बैठकीत मंजूर केलेले ठराव
सभेत मुख्याधिकारी भोसले यांच्या कामाचे अवलोकन करण्यात आले. यात मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील ओपन स्पेस व अवैध बांधकामे यांची माहिती घेतली. याचा अहवाल व माहिती पुढील बैठकीत सादर करणे, मालमत्ता कर मूल्यांकन, पाणीपट्टीवर चर्चा झाली, तर आर्य वैश्य व मराठा भवनाला जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष शेख यांनी दिली.
.......