बीड : कोरोना संशयित असलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. स्वॅब घेतले असता ते निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोनाशी संबंध नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. अंबाजोगाईतील कामगाराचा यकृतने तर गेवराईच्याला फुफ्फुसाचा आजार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना संशयित असल्याने दोघांचेही शवविच्छेदन झाले नाही.
गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथील ३८ वर्षीय व्यक्ती औरंगाबादहून आल्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे दिसली होती. तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. स्वॅबही पाठविला. तो निगेटिव्हही आला. परंतु अचानक प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा स्वॅब घेऊन पुण्याला पाठविला. तो देखील निगेटिव्ह आला. त्याचा मृत्यू हा कोरोनामुळे नव्हे तर त्याला अस्थमा, फुफ्फुसाचा आजार असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यावर आगोदरच उपचार सुरू होते. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.
अंबाजोगाईतही ओरीसा राज्यातून आलेल्या कामगाराचा आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब घेतल्यानंतर अहवालही निगेटिव्ह आला होता. त्यामुळे हा मृत्यूही कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला यकृतचा आजार होता. त्यामुळे त्याची अचानक प्रकृती खालावली आणि मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरू नये; आवाहन बीडमध्ये कोरोना संशयितांचा मृत्यू झाल्याने नागरिक घाबरले होते. परंतु दोघांचाही कोरोनाशी कसलाच संबंध नाही. दोघांचेही स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, धीर धरावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले जात आहे.
कोरोना स्वॅब निगेटिव्ह आले आहेतदोघा मयतांचे कोरोना स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कोरोनाशी संबंध नाही. गेवराईतील व्यक्तीला फुफ्फुसाचा आणि अंबाजोगाईतील कामगाराला यकृतचा आजार होता. त्यांच्यावर आगोदरच उपचार सुरू होते. दोघेही कोरोना संशयित असल्याने शवविच्छेदन केले नाही.- डॉ.अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड