बीड : डॉक्टर व परिचारिकांच्या गलथान कारभारामुळेच जिल्हा रुग्णालयातील बाळाच्या अदलाबदलीचे नाट्य घडल्याचे उघडकीस आले आहे. अदलाबदलीचा संशय असलेली मुलगी छाया राजू थिटे यांचीच असल्याचे डीएनए अहवालावरून स्पष्ट झाले आहे.छाया राजू थिटे (हिंगोली, ह. मु. रा. कुप्पा, ता. वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता बाळाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसूती विभागात मुलगा अशी झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र खासगी रुग्णालयात या बाळाची मुलगी अशी नोंद करण्यात आली. १० दिवसांच्या उपचारानंतर त्याला सुट्टी देण्यात आली. या वेळी थिटे कुटुंबीयांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावून गेले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलिसांनी तत्काळ जिल्हा व खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले. बाळाचे रक्त नमुने घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठविले. बुधवारी सायंकाळी त्याचा अहवाल आला. त्यात ही मुलगी छाया थिटे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले.या अहवालामुळे वादावर पडदा पडला आहे़ मात्र रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना मिळाला आहे़ यापुढे अशी चूक होऊ नये, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत़
बाळाची अदलाबदल झाली नाही , बीड जिल्हा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 6:43 AM