बीड : महिलांच्या संबंधित सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सहा उपविभागात पिंक मोबाईल पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांना २३ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या हस्ते अत्याधुनिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अधीक्षकांनी महिला अत्याचाराचे गुन्हे संवेदनशीलपणे हाताळा व तपासात हलगर्जीपणा करू नका, असे निर्देश दिले.
जिल्ह्यात महिला अत्याचार रोखण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या संकल्पनेतून पिंक मोबाईल पथक ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक उपविभागात स्वतंत्र पथक स्थापन करून त्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या पथकांना स्वतंत्र वाहने उपलब्ध करून दिली आहेत. दरम्यान, पथकांचे कामकाज अधिक सोयीस्कर व जलदगतीने व्हावे, यासाठी एक लॅपटॉप, चार फोल्डिंग चेअर देण्यात आल्या.
पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी कौशल्यपूर्ण तपास करून तसेच सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात विनाविलंब सादर करावे, अशा सूचना अधीक्षक आर. राजा यांनी दिल्या. पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपनिरीक्षक राणी सानप, अर्चना भोसले, मीना तुपे, सीमाली कोळी, सहायक निरीक्षक अविनाश राठोड आदींची उपस्थिती होती.
230921\23bed_8_23092021_14.jpg
पिंक पथकास पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या हस्तेे गुरुवारी साहित्य वाटप करण्यात आले.