अगोदरच कोरोनाच्या स्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. अशी स्थिती असताना गॅसची भाववाढ सातत्याने होत चालली आहे. परिणामी, सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे. या महागाईच्या धोरणामुळे नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी व झाडांची कत्तल रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना राबविली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत गॅस दिला जात होता. मात्र, अचानकच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनाही या लाभापासून वंचित ठेवले. आता त्यांनाही महागड्या किमतीचा गॅस विकत घ्यावा लागणार आहे.
गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय? अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. अगोदरच तालुक्याच्या ठिकाणांहून गॅस आणावा लागायचा. आता तो गॅस महाग झाल्याने सिलिंडर शोभेची वस्तू होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.