बीड : भव्य सभामंडप...एकाचवेळी तब्बल ३०६ पाळण्यात बसवलेल्या चिमुकल्या... व्यासपीठावरून गायिली जाणारी बारशाची गीते...अन् तुडूंब भरलेल्या सभामंडपात नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई... हे चित्र बीडकरांनी दुसºयांदा अनुभवले. निमित्त होते येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात आयोजित कन्यारत्नांच्या सामुहिक नामकरण सोहळ्याचे. मातेला साडी, चोळीचा आहेर करून मुलीचे नामकरण करण्यात आले. हा कार्यक्रम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’साठी राज्यभरासाठी ‘मॉडेल’ ठरले आहे.
यंदा दुस-या वर्षीही ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत राजयोग फाऊंडेशन व कुटे ग्रुप फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी १५ आॅक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ दरम्यान जन्मलेल्या मुलींच्या नामकरणाचा हा सोहळा थाटात पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी, सचिव सुशील खटोड, शुभम खटोड, आशिष खटोड, निर्मला खटोड अनिता खटोड, मंगला खटोड, प्रज्ञा रामदासी, पल्लवी खटोड, श्रध्दा बोेरा, योगेश बोरा, पारसमल बोरा, कोमल खटोड, सिध्दार्थ मुनोत यांच्यासह हजारों नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रत्येकजण आपल्या मुलीचे नामकरण घरात करीत असतो. परंतु बीडमध्ये हा नामकरण सोहळा अनोख्या पद्धतीने करण्यात आला. एकाच मांडवाखाली तब्बल ३०६ मुलींचे नाव ठेवण्याचा कार्यक्र म डोळे दिपवणारा ठरला. जो जिल्हा स्त्री भ्रूण हत्येमुळे कलंकित झाला होता, आज त्याच बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानकडून झालेले स्वागत निश्चितच स्वागतार्ह असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
याप्रसंगी कुटे ग्रुपचे ज्ञानोबा कुटे, राजयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप धुत यांचेही प्रतिष्ठानकडून स्वागत करण्यात आले. या नामकरण सोहळ्याची ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. स्त्री जन्माच्या स्वागताचा प्रतिष्ठाणचा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी व्यक्त केले.मुलीला पाळण्यासह चांदीचे कडे, भेटवस्तूमुलींच्या नामकरण सोहळ्यात मुलींना पाळणा, कपडे, खेळणी, चांदीचे वाळे अशा वस्तु भेट स्वरु पात देण्यात आल्या. तर मुलीच्या मातेला साडीचोळीचा आहेर, तसेच फेटा बांधून हळदी-कुंकू लावून स्वागत सत्कार करण्यात आले. तसेच अल्पोपाहाराची व्यवस्थाही प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली होती. यावेळी औरंगाबाद येथील अनघा संदीप काळे व गौरव पवार यांचा संगीतमय कार्यक्रमही झाला.