माजलगाव (बीड ) : ११९ वर्षाची परंपरा असलेल्या येथील टेंबे गणपतीला शनिवारी भाद्रपद प्रतिपदेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोरया-मोरयाच्या गजरात आणि पेटत्या टेंब्याच्या साक्षीने मिरवणुकीने निरोप दिला.
निजामकालीन आख्यायिका असलेल्या येथील टेंबे गणपतीची भाद्रपद एकादशीला स्थापना होते. यानंतर आज शनिवारी सहाव्या दिवशी सायंकाळी राममंदिर येथून विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी हाती पेटते टेंबे घेतले होते. गणपतीची सहा फुटी मूर्तीची भाविकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. यावेळी भाविकांनी घराघरासमोर सडा-रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी गणपतीची आरती करून दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली. मिरवणूकी दरम्यान चंद्रयान व भगवान शंकराचे तांडव नृत्य असा मोहक देखावा सादर करण्यात आला. दर्शनासाठी राज्यातून व परराज्यातील भाविक मोठया प्रमाणात आले होते.
१९०१ साली निजाम राजवटीमध्ये झाली होती स्थापना
माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणेश. या गणेशाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा स्थापनाही उशिराने होते आणि अवघ्या पाच दिवसानंतर तो विसर्जित केला जातो. पण या दरम्यानच्या काळात कुठेही गणेश विसर्जन राहिलेले नसते. त्यामुळे या गणपतीला विशेष महत्व आहे. तसेच ब्रह्मवृंदांच्या हातानेच या गणपतीची मूर्ती साध्या मातीपासूनच अगदी परंपरेने ११८ वर्षांपासून बनवली जात असल्याने त्या मूर्तीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते. भट गल्लीमध्ये स्थापन होणाऱ्या व नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभर ओळख असलेल्या या टेंबे गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीला झाले.
राज्यामध्ये आगळीवेगळी ओळख असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना १९०१ साली निजाम राजवटीमध्ये झाली होती. निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला टेंबे गणेशाचे आगमण होते आणि पाच दिवसांनी म्हणजे भाद्रपद पोर्णिमेला विसर्जन होते. या पाठीमागे देखील एक प्रसंग असून स्वातंत्र्यपूर्व काळात १९०१ साली निजाम राजवटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रझाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रझाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली होती. गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निझाम सरकारकडून मागितला गेला. त्यामुळे मंडळाचे तत्कालिन सदस्य कोंडोपंत जोशी, गणतप जोशी, मल्हार जोशी, राजाराम जोशी, राम जोशी, काशिनाथजोशी यांनी परवाना आणण्यासाठी वाहनांची सोय नसल्यामुळे घोड्यावरून भाग्यनगर म्हणजेच हैद्राबाद येथे गेले व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी आणली.या दरम्यान गेलेल्या कालावधीमुळे या गणपतीची स्थापना उशिराने होते आणि विसर्जन देखील उशिराने होते.