बीड : जिल्ह्यात त्यातही विशेषत: परळी मतदार संघात मतदारांना बाहेर काढून भाजपने गुंडाकडून मतदान करून घेतले. आता यापुढे परळीत लोकशाही ऐवजी गुंडाराज चालणार का? असा सवाल उपस्थित करत आ.रोहित पवार यांनी तीन व्हिडीओ सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट केले आहेत. भविष्यात असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकसभेची मतदान प्रक्रिया १३ मे रोजी पार पडली. यात जिल्ह्यातील काही मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. या तक्रारीचे निरसण होण्याआधीच आ.रोहित पवार यांनीही तीन व्हिडीओ सोशल मिडियात पोस्ट करून बीड जिल्ह्यात बोगत मतदान झाल्याचा आरोप केला आहे. खासकरून परळी मतदार संघात मतदारांना बाहेर काढून भाजपने गुंडांकडून मतदान करून घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग याला चाप लावणार की बघ्याची भूमिका घेणार? याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी आ.पवार यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करण्यासाठी अनेकदा काॅल केला, परंतू त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.
एक्सच्या पोस्टमध्ये काय म्हटले...बीड जिल्ह्यात विशेषता परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? @ECISVEEP ने उत्तर द्यावे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.---
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचाही व्हिडीओ...परळी मतदार संघातीलच एका केंद्रावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गेले होते. तेथे बोगस मतदानावरून कर्मचाऱ्यांना बोलत असल्याचा एक कथीत व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याबाबत अद्यापतरी प्रशासनाकडे तक्रार आलेली नाही.