- प्रभात बुडूख
बीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती. त्यानंतर कारवाई होण्याच्या भीतीने पुढील दोन दिवसात बहुतांश चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या घटल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून १२ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले व कारवाई करत खाबूगिरी करणाऱ्या १८ चारा छावण्यांना प्रशासनाने नोटीस दिली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असून गुन्हे दाखल होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.
चारा छावण्यांतून शासनाला दररोज अंदाजे १२ लाखांचा चूना या मथळ््याखाली १२ मे रोजी ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. ९ मे रोजी प्रशासनाकडून अचानक चारा छावण्याची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर ७४४ जनावरे जास्त दाखवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे छावणी रद्द करण्याची कारवाई झाली होती. दोन तलाठी निलंबित करण्यात आले होते. कारवाईच्या भीतीने १० मे रोजी दिलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील चारा छावण्यावरील जनावरांची संख्या १७ हजार ९१ एवढी घटली होती. म्हणजे कारवाई करण्यापूर्वी ही जनावरे अधिक दाखवून मलिदा खाण्याचा प्रयत्न काही छावणी चालकांकडून करण्यात येत होता.