बीड : येथील वरिष्ठ तुरूंग अधिकारी संजय कांबळे यांचा बीडमधील लोटस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. यात हलगर्जी झाल्याचा आरोप करीत तक्रार करण्यात आली होती. याला महिना उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण करून अहवाल दिला नाही. याबाबत आता चौकशी समितीलाच नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकारावरून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.
वरिष्ठ तुरूंग अधिकारी संजय कांबळे यांचा ३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. लोटस हाॅस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी वेळीच व योग्य उपचार न केल्यामुळेच कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी तक्रार केली होती. यावर चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डाॅ.संजय राऊत, डॉ.मंडलेचा यांची समिती तयार केली. याला महिना उलटूनही अद्याप अहवाल दिलेला नाही. विशेष म्हणजे याचा अहवाल सोमवारी देणार असल्याचे सांगितले होते. परंतु दिला नसल्याने समितीच्या चौकशीवरच संशय व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण दडपण्यासाठीच चौकशीला उशीर लावल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला चौकशीला उशीर झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी मंगळवारी समितीलाच नोटीस बजावली आहे. यावर समिती सदस्यांकडून चौकशी अहवाल किती कालावधीत कशा प्रकारे येतो यावर पुढील कार्यवाही अवलंबून असल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीलाच नोटीस दिल्याने अहवाल तत्परतेने मिळेल असा कयास आहे.
लोटस हॉस्पिटलच्या चौकशीचा अहवाल सोमवारी देतो म्हणाले होते. परंतु आणखी आला नाही. आता समितीलाच नोटीस बजावून उशिराच्या कारणासहीत खुलासा मागविला आहे. - डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
अद्याप अहवाल दिलेला नाही. डाॅ.राऊत व डॉ.मंडलेचा हे इतर ठिकाणचे आहेत. त्यांना वेळ नव्हता म्हणून अहवाल देण्यास उशीर होत आहे. - डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड