: कोविड रुग्णांची माहिती शासनास वेळेवर कळवत नसल्याच्या कारणावरून माजलगाव येथील चार रूग्णालयांना कारवाई का करू नये, याबाबत विचारणा करणाऱ्या नोटीस बजावल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी ही माहिती दिली.
माजलगाव येथे ताप, सर्दी, खोकला यावर उपचारासाठी रुग्ण देशपांडे हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल, योगीराज हॉस्पिटल व साई हॉस्पिटल मध्ये रुग्ण येतात. या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला व इतर आजार आहेत का असल्यास ती माहिती नियमानुसार प्रशासनास कळवणे आवश्यक आहे. मात्र या रुग्णांवर रूग्णालयात उपचार करून पाठवले जाते. कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी नेमलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या सर्दी, ताप, खोकला व इतर आजारांबाबत दिली जात नाही. परिणामी आरोग्य उपायोजनेत अडथळे येत आहेत. रुग्णांचे रेकॉर्ड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात वेळेत सादर करण्यात येत नसल्याने प्रशासन अडचणीत येत आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये आपणावर कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा २४ तासात खुलासा करावा,न केल्यास कायदेशीर कारवाई करून बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल असेही या नोटीसद्वारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मधुकर घुबडे यांनी खासगी डॉक्टरांना बजावले आहे.