बीड : मध्य प्रदेश राज्यातून १५ हजार रुपयांना आणलेला गावठी कट्टा बीडमध्ये ३५ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या कुख्यात छोट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून दोन कट्ट्यांसह चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर जिल्ह्यात जाऊन केली. या कारवाईने गणेशोत्सवातील मोठे 'विघ्न' टळले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत आहे.
सुयोग ऊर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (वय २४, रा. माळीवेस, बीड) असे आरोपीचे नाव आहे. छोट्याने मागील तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश राज्यातून पाच गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे आणली होते. यातील तीन कट्टे हे बीडमधीलच सागर प्रकाश मोरे (वय २२, रा. प्रकाशनगर, बीड), वैभव संजय वराट (वय २१, रा.स्वराज्यनगर, बीड) व शहानवाज ऊर्फ शहानू अजिज शेख (रा. बालेपीर, बीड) यांना विक्री केले होते. ही माहिती मिळताच एलसीबीने या तिघांना बेड्या ठोकून तीन कट्ट्यांसह सात जिवंत काडतुसे पकडली होती. परंतु, यातील मुख्य सूत्रधार असलेला छोट्या फरार झाला होता.
त्याच्या मागावर एलसीबीचे पथक होते. दोन दिवसांपूर्वी तो बीड व परिसरातील जिल्ह्यात फिरत असल्याची माहिती उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना मिळाली. बुधवारी सकाळी तो अहमनगरला असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. शिवाय त्याच्याकडून गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे पकडली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, विकास वाघमारे, प्रसाद कदम, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, चालक बागलाने आदींनी केली.