शिरूर कासार : सध्या कोरोना नियंत्रणासाठी छोट्यापासून थोरांपर्यंत सर्वांना सुरक्षेच्या दृष्टीने मास्क हे अनिवार्य झाले आहे, मात्र हेच मास्क बहुतांश वेळी फेकून देतांना निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. फेकून दिलेल्या कचऱ्यात तसेच रस्त्यावर जागोजागी मास्क दिसत असल्याने धोका कमी कसा होणार, यावर प्रश्नचिन्ह उमटल्याशिवाय राहत नाही.
नागरिकांनी वापरलेले मास्क इतस्त: फेकून न देता काळजीपूर्वक त्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी व नगरपंचायत मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.
पिण्याच्या पाण्याबाबत गाफीलपणा धोक्याचा
शिरूर कासार : नगरपंचायतीकडून एक तर पंधरा पंधरा दिवसांआड पाणी सोडण्यात येते. त्यातही हे पाणी पिण्याबाबत शंका येत असल्याने पर्याय म्हणून फिल्टरचे पाणी विकत घेतले जात आहे. पाण्याबाबत दिसून येत असलेला गाफीलपणा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
किराणा खरेदीसाठी दुकानांवर झुंबड
शिरूर कासार : मंगळवारी किराणा दुकाने सुरू ठेवण्यासाठी शिथिलता व वेळ ठरवून दिली होती. घरात लागत असलेले आवश्यक सामान खरेदीसाठी किराणा दुकानांवर झुंबड उडाली होती, तर या नादात कोरोनाची नियमावली तुडवली जात होती.
वैरणीच्या गंजी लावण्यात शेतकरी मग्न
शिरूर कासार : पावसाळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, परिणामी पशुधनासाठी लागणारा चारा भिजू नये यासाठी कडबा ,सरमाडाच्या गंजी लावण्यात शेतकरी मग्न असल्याचे दिसून येते.
शेककऱ्यांकडून खरिपाचे नियोजन सुरू
शिरूर कासार : म्हणता म्हणता पावसाळा जवळ येऊन ठेपला. कोरोनाने त्रस्त करून सोडले. कित्येकांच्या घरी दुःखाश्रूंचा पूर अजूनही वाहतोय अशाही काळात शेतकरी मात्र हे सर्व दुःख झेलत मढे झाकूनिया करिती पेरणी या न्यायाने भविष्याची चिंता म्हणून येणाऱ्या खरिप हंगामात काय पेरायचे, काय लावायचे, कोणते बियाणे, खते वापरायची याबाबत चर्चा करून नियोजन करू लागला असल्याचे दिसून येत आहे.