- पुरुषोत्तम करवामाजलगाव: निवृत्ती जाहीर करून पुतण्याचे नाव पुढे केल्यानंतर पुन्हा स्वतःच उमेदवारी घेतल्यामुळे प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके आणि त्यांचे समर्थक नाराज झाले होते. दरम्यान, शरद पवार गटाकडून आडसकर यांना उमेदवारी मिळत असल्यामुळे त्यांना फक्त प्रकाश सोळंके पाडू शकतात अशा प्रकारची अजित पवार यांची क्लिप व्हायरल झाली होती. परंतु आडसकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रकाश सोळंके यांची उमेदवारी बदलून जयसिंह सोळंके यांना द्यावी, अशी मागणी करण्यासाठी जयसिंह सोळंके यांचे शेकडो समर्थक अजित पवार यांना भेटायला गेल्याची माहिती आहे.
दोन महिन्यापूर्वी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचबरोबर मागील निवडणुकीत ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे केले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळता पुन्हा प्रकाश सोळंके यांनाच तिकीट मिळाले. यामुळे जयसिंह सोळंके यांचे कार्यकर्ते नाराज झाले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी शरद पवार गटाकडून रमेश आडसकर यांचे नाव येत असल्यामुळे त्यांना केवळ प्रकाश सोळंकेच पाडू शकतात. त्यामुळे त्यांना कोराच बी फार्म दिल्याचे सांगितले होते. प्रकाश सोळंके यांनी कोऱ्या बी फॉर्मवर जयसिंह सोळंके यांचे नाव टाकण्याऐवजी स्वतःचेच नाव टाकल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
जगताप यांना उमेदवारी आता जयसिंह यांना तिकीट द्याशरद पवार गटाकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आता प्रकाश सोळंके ऐवजी जयसिंह सोळंके यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी माजलगाव मतदार संघातील १५० ते २०० गाड्या रविवारी रात्री मुंबईकडे रवाना झाल्या. मुंबईला शेकडो कार्यकर्ते गेले असून ते आज अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
प्रकाश सोळंकेंनी अद्याप उमेदवारी दाखल केली नाहीविशेष म्हणजे, प्रकाश सोळंके यांना चार दिवसापूर्वीच उमेदवारी मिळाल्यानंतर देखील अद्याप पर्यंत त्यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. यामुळे अजित पवार यांच्या भेटी नंतरच यात काहीतरी मार्ग निघू शकेल, असे जयसिंह सोळंके यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जाऊ लागले आहे. जयसिंह सोळंके यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांचे समर्थक प्रकाश सोळंके यांचा प्रचार करणार नसल्याची देखील चर्चा पहावयास मिळत आहे.