शिरूर कासार : गावपातळीवर तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्त समिती, शांतता समिती, स्वच्छता समिती, व्यसनमुक्ती समिती अशा एक ना अनेक समित्या आहेत. आता नव्याने शेत रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाने आता शेत रस्ता समिती गठित केली आहे. या समितीत अकरा सदस्य असून सरपंच अध्यक्ष असतील.
क्षेत्र तेवढेच परंतु दिवसेंदिवस भोगवटादारांची संख्या वाढत असून, शेतात जाणे-येणे या कारणावरून वाद निर्माण होतात. हे वाद कधी विकोपाला जाऊन कोर्ट कचेरी, एकमेकांवर गुन्हे दाखल करणे, इथपर्यंत जाऊन शेतकऱ्यांचा वेळ व पैसा अनाठायी खर्च तर होतोच, शिवाय त्याच्या प्रगतीला सुद्धा बाधा पोहचते. अनेक वेळा क्षमता असूनही निव्वळ रस्त्यामुळे बारमाही बागायती, भाजीपाला उत्पादन किंवा फळबाग लागवड करताना रस्ता नसल्याचेच कारण पुढे येते. अशा किरकोळ वादाचा निपटारा गावपातळीवरच व्हावा यासाठी रस्ता समिती गठित करून समितीवर गावपातळीवरचे प्रश्न सामोपचाराने मिटवण्याची जबाबदारी सोपवली आहे.
शेतीकामे होतील सुलभ
केवळ रस्ते नसल्यामुळेच बागायती नगदी पीक ने-आण करणे, पेरणी, मशागत, पीक कापणी वेळेवर करता न येणे, रात्री अपरात्री शेतात जाणे, नाशवंत पिकांना वेळेवर बाजारपेठ, इच्छा असूनही शेतीपूरक दुग्ध, मत्स्य, कुक्कटपालन, शेळीपालन, कृषी गोदाम उभारणे शक्य होत नाही. शिवाय सर्प दंश, वीज कोसळणे, पूर येणे, आग लागणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर मात करणे रस्त्याअभावी शक्य होत नसल्याने किंवा रस्त्यामुळे वारंवार होणाऱ्या वादास कंटाळून नको म्हणून शेत विक्री करणे, अशा घटना घडतात. हे सर्व टाळण्यासाठी शेत रस्त्यांचे प्रश्न समितीच्या मध्यस्थीने कायमस्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने ही समिती नेमली जात आहे.
तहसीलदारांना अधिकार
एका गावावरून दुसऱ्या गावास जाणारा रस्ता, शेतात जाणारी पायवाट, गाडीरस्ता कधीकधी नकाशावर नसतात; परंतु वाद निर्माण झालाच तर अशा वेळी निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १४३ अन्वये तहसीलदारांना अधिकार दिलेले आहेत. रस्त्याबाबत मागणी असल्यास तसा अर्ज संबधितांनी तहसीलदारांकडे केल्यास कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणे सोपे होणार आहे.
समितीमुळे गाव पातळीवर प्रश्न सुटतील
गावचा सरपंच अध्यक्ष तर सदस्य म्हणून मंडल अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, प्रगतिशील शेतकरी, ग्रामपंचायत महिला सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, बीट अंमलदार, पोलीस पाटील व अकरावा तलाठी अशी ही समिती कार्यरत राहणार आहे. या समितीत असलेले सदस्य हे सहसा गावपातळीवर अभ्यासू असतात. त्यांना बऱ्यापैकी माहिती असते, म्हणून ही समिती गावपातळीवर रस्ते प्रश्नावर चांगले काम करील.
श्रीराम बेंडे, तहसीलदार, शिरूर कासार.