बीड : कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आता नेतेही सरसावू लागले आहेत. बुधवारी रात्री खा. डॉ.प्रीतम मुंडे यांनी कोरोना वॉर्डात जावून राऊंड घेतला. रूग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर स्वयंपाकगृह व परिसराची पाहणी केली. सर्व आढावा घेतल्यानंतर रूग्णांना पूर्ण सुविधा व सेवा देण्याच्या सुचना खा.मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या रोज नवा उच्चांक गाठत आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्ण सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. हाच धागा पकडून खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी बुधवारी रात्री जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. सुरूवातीला ऑक्सिजन प्लांटची पाहणी करून पुरवठा व उपलब्धतेची माहिती घेतली. त्यानंतर स्वयंपाकगृहाची पाहणी केली. नंतर त्या थेट कोरोना वॉर्डमध्ये गेल्या. प्रत्येक वॉर्डमध्ये जावून त्यांनी रूग्णांशी संवाद साधला. अडचणी जाणून घेतल्या. काही रूग्णांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच अस्वच्छता आदींबाबत समस्या मांडल्या. तसेच डॉक्टर, परिचारीकांशीही संवाद साधला. यावेळी अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सचीन आंधळकर, डॉ.जयश्री बांगर, मेट्रन संगिता दिंडकर आदींची उपस्थित होती.
नेते म्हणाले, कीट भयानकच बाबा...
खासदार डॉ. मुंडे यांच्यासोबत काही राजकीय नेते आणि कार्यकर्तेही पीपीई कीट घालून वॉर्डमध्ये गेले. खासदार स्वता: डॉक्टर असल्याने त्यांना याची जाणीव होती. परंतू इतर नेत्यांनी पहिल्यांदाच कीट घालून वॉर्डमध्ये राऊंड घेतला. परत येताच हे सर्व नेते घामाघूम झाले होते. अंगातून आग निघेतय .. खूप भयानक आहे ही कीट, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. नेते केवळ तासभर कीटमध्ये राहू शकत नाहीत, त्या ठिकाणी आरोग्यकर्मी ८ तास कीटमध्ये असतात. एवढेच नव्हे तर या त्रासासह ते सेवाही देत असतात.
===Photopath===
150421\15_2_bed_20_15042021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये जावून खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी रूग्णांशी संवाद साधला. सोबत डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सचिन आंधळकर, मेट्रन संगिता दिंडकर आदी.