लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे चित्र विदारक बनत चालले आहे. अगोदर खाटांसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती आता मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अंबाजोगाईत मंगळवारी पुन्हा एकदा आठ मयतांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वीही अशीच घटना गतवर्षी घडली होती. या विदारक परिस्थितीवरून कोरोनाची अवस्था लक्षात येते.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून मृत्यूचे सत्र सुरूच आहे. नव्या रुग्णसंख्येने तर विक्रम मोडलाच परंतु, मृत्यूनेही उच्चांक गाठला आहे. मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ऑडीटच्या नावाखाली केवळ कागदी घाेडे नाचविले जात आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांना हे मृत्यू रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसते.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय अथवा इतर शासकीय, खाजगी आरोग्य संस्थेत कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. एकाचवेळी तीन ते चार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाईमध्ये सर्वाधिक मृत्यू असल्याने तेथे जास्त घडत आहे.
मृत्यू प्रमाणपत्रही वेळेत मिळेना
सध्या कोरोनामुळे मृत्यू वाढत आहे. हेल्थ इन्शूरन्स व इतर आवश्यक लाभ घेण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राची गरज भासत आहे. परंतु, पालिका, नगर पंचायतींमध्ये कोरोनामुळे हे विभाग अनेकदा बंद असतात. बीड पालिकेतही यासाठी रांगा लागत आहेत. काहीवेळा कर्मचारी नसतात, आणि कर्मचारी असले तरी तांत्रिक अडचणी असतात. यात सामान्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. दोन चार वेळा खेटे मारल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविले. या विभागातही मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे.
अंबाजोगाईत मृत्यूसत्र सुरूच
जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू हे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील आहेत. बाधित असल्याने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. प्रशासन म्हणून नगर पालिका अंत्यसंस्कार करते. अंबाजोगाईत मांडवा रोडवरील डंपींग ग्राऊंडवर स्मशानभूमि तयार करून बाधितांवर अंत्यसंस्कार केले जातात. गतवर्षी याच स्मशानभूमित एकाचवेळी ८ लोकांवर अंत्यसंस्कार झाले होत आता मंगळवारीही तशीच परिस्थिती पुन्हा झाली. अंबाजोगाईतील मृत्यूसत्र थांबत नसल्याचे यावरून दिसत आहे.
---
आकडेवारी
१ एप्रिल ६
२ एप्रिल २
३ एप्रिल १२
४ एप्रिल ४
५ एप्रिल ३
६ एप्रिल १०