शिरूर कासार : ऊसतोड मजुरांचा तालुका अशी ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातून जवळपास पंचवीस ते तीस हजार मजूर राज्य व राज्याबाहेर घराला कुलूप लावून सहा महिन्यांकरिता जातात. मात्र, त्याची कुठलीही रीतसर माहिती कुठेच उपलब्ध नसायची. आता मात्र शासनाकडून या मजुरांची दखल घेतली जात आहे. स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार खानेसुमारी करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. आपली संपूर्ण माहिती ग्रामसेवकांकडे देण्याचे आवाहन प्रभारी गटविकास अधिकारी महादेव जायभाये यांनी केले आहे. गावपातळीवर ग्रामपंचायत ग्रामसेवकांच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. पाच ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याने मजुरांनी कुटुंबाची माहिती विहीत नमुन्यातील अर्जात भरून देण्याचे आवाहन गटविकास अधिकारी महादेव जायभाये यांनी केले आहे. तालुक्यात ५२ ग्रामपंचायत असून, ग्रामसेवकांच्या माध्यमातून सर्व ऊसतोड मजुरांची माहिती अर्ज भरून संकलित करण्याचे काम सुरू झाल्याचे जायभाये यांनी सांगितले.
आता होणार ऊसतोड मजुरांची खानेसुमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:39 AM