बीड : लूटमार, छेडछाड, वादविवाद, दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या १५०० हॉटस्पॉट्सवर आता पोलिसांचा हमखास वॉच राहणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलात सुबाहू ॲपची प्रणाली लागू होणार आहे. क्यूआर कोड स्कॅन करून पोलिसांच्या गस्तीची नोंद होईल. यासोबतच जीपीएसद्वारे पोलिसांच्या वाहनांचा मागोवा घेणेही साेयीचे होणार आहे.
पोलिसांच्या गस्तीच्या नोंदीसाठी आतापर्यंत लॉगबुक प्रणाली होती. काळाच्या ओघात ती मागे पडणार असून आता त्याऐवजी सुबाहू ॲपद्वारे ई-बीट प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे.
चोरी, घरफोडी, जबरी चोरी झाल्यानंतर किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यावर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचतात, असा नाराजीचा सूर असतो. पोलिसांकडून जलद प्रतिसाद मिळावा व गुन्हेगारांवर वचक राहावा यासाठी जिल्ह्यातील २८ ठाणे हद्दीत १५०० संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
...
गस्तमार्गाचीही होणार पडताळणी
जिल्हा पोलीस दलात जून महिन्यात १५२ दुचाकी दाखल झाल्या. गस्त घालण्यासाठी या दुचाकींचा वापर करण्यात येणार आहे. गस्तीवरील अंमलदारांकडील मोबाइलवरून संवेदनशील ठिकाणी भेट दिल्याची नोंद क्यूआर कोड स्कॅन करून करावी लागणार आहे. या ॲपमध्ये फोटो व संदेश लिहिण्याचीही सुविधा आहे. वाहनांना जीपीएस बसविले जाणार असून त्यामुळे गस्तमार्गाची पडताळणी करणेही सोयीचे होईल.
....
२८ पोलीस ठाण्यांतर्गत संवेदनशील १५०० ठिकाणे निश्चित केली आहेत. सुबाहू ॲपद्वारे ठाणेप्रमुखांनी निश्चित केलेल्या ठिकाणांना गस्तीदरम्यान भेट देणे अनिवार्य राहील. मोबाइलद्वारे संबंधित ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करावे लागेल. त्यातून हजेरीची नोंद होईल. त्यामुळे पोलिसांचा तत्काळ प्रतिसाद मिळेल, संबंधित ठिकाणच्या संभाव्य घटनाही टळू शकतील. लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
....
तीन वर्षांतील गुन्ह्यांचा लेखाजोखा
मागील तीन वर्षांत विशिष्ट ठिकाणी वारंवार घडलेल्या गुन्ह्यांचा लेखाजोखा जाणून घेण्यात आला. त्यातून १५०० हॉटस्पॉटस् निश्चित करण्यात आली. महापुरुषांचे पुतळे, धार्मिक स्थळे चौक, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, बसस्थानक, वर्दळीचे रस्ते यांचा यात समावेश आहे.
....
020921\02bed_23_02092021_14.jpg
आर.राजा, पोलीस अधीक्षक