आष्टी : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. शासनाच्या निर्बंधांमुळे जिल्ह्यातील १५ हजार सलून बंद असून चालकांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे. नाभिक समाजासह बाराबलुतेदारांना शासनाने आर्थिक मदत जाहीर न केल्यास नाभिक समाज मुंडण आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिला.
राज्य सरकारने ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत, अशांना आर्थिक पॅकेज जाहीर केले. मात्र, लोकांना खरी गरज जो गावगाड्यात खऱ्या अर्थाने बलुतेदार पद्धतीने जीवन जगतो, लोकांनी अन्नधान्य दिल्यानंतर ज्यांची उपजीविका भागते, त्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही. राज्यात नाभिक समाजाच्या २९ आत्महत्या झाल्या. एकाही लोकप्रतिनिधीने साधी चौकशीही केली नाही किंवा कसलीही मदत केली नाही. राज्य सरकारने या २९ कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत लवकर जाहीर करावी. तसेच सुुतार, लोहार, कुंभार, धोबी यांच्यासारख्या अनेक छोटछोट्या अनेक व्यावसायिक व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन महिने झाले दुकानदारी बंद आहे. बलुतेदारांना जगण्याचे साधनही उरले नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा सवाल कावरे यांनी केला. या अगोदर राज्य शासनाला अनेक निवेदने दिली, आंदोलने केली.
तरी, कसलीही मदत राज्य सरकारने केलेली नाही. या राज्य सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात लवकरच मुंडण आंदोलन करणार असल्याचा इशारा कावरे यांनी दिला आहे.