लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. आजघडीला ५९९ छावण्या कार्यरत आहेत. एका महिन्यात छावण्यांवरील जनावरांची संख्या दुप्पट झाली आहे. यापैकी अनेक छावण्यांवर नियमांचे पालन केले जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ३५१ पेक्षा अधिक चारा छावण्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु हे पथक नुसते नावालाच असल्याने अहवाल तयार असून देखील एकाही छावणीवर कारवाई करण्यात आलेली नाही.५९९ पैकी बीड तालुक्यात १८७ व आष्टी तालुक्यात १८५ चारा छावण्या आहेत. त्यानंतर क्रमश: शिरुर, पाटोदा, केज, गेवराई, अंबाजोगाई येथे छावण्या आहेत. या छावण्यांवरील जनावरांच्या संख्येत ३०० ते ८०० चा फरक दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील पशुधन व छावण्यांवरील जनावरांची संख्या यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. जनावरांची योग्य तपासणी करणे व जास्त जनावरे असतील तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शासनाला २० ते ३० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.चारा मिळतो, पण पेंड नाही...
.दोन्ही हंगामातील पेरा हा कमी झालेला असल्यामुळे चारा शिल्लक नाही. त्यामुळे चारा छावणी ही शेतकऱ्यांना आधार वाटत आहे. अनेक छावण्यांवर चारा दिला जातो. मात्र, पेंड मिळत नाही असे शेतकरी सांगतात. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शेतक-यांची सर्व व्यवस्था करणे छावणी चालकांना बंधनकारक आहे. त्यामुळे योग्य व्यवस्था होत नसले तर शेतक-यांनी देखील जागरुक राहून तक्रार करणे गरजेचे आहे.