माजलगाव : मागील दोन महिन्यांच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात प्रचंड प्रमाणात वाढली होती. सुरुवातीला शहर कोरोना रुग्ण वाढले होते; परंतु ग्रामीण भागात नियमांचे पालन होत नसल्याने मागील एक महिन्याच्या काळात रुग्णसंख्या चांगलीच वाढली.
माजलगाव तालुक्यात पहिल्या लाटेत जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रुग्ण वाढलेले असताना दीड ते दोन महिने एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यावेळी रुग्ण निघायला सुरुवात झाली तीही ग्रामीण भागातूनच. तसे पहिल्या लाॅकडाऊनमध्ये तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्यादेखील खूपच कमी होती.
दुसरी कोरोना लाट सुरू झाली त्या सुरुवातीच्या काळातच शहरात झालेले लग्न, साखरपुडे, आदी कार्यक्रमात नियमांचे पालन न केल्याने सुरुवातीस रुग्णांची मोठ्या प्रमाणात संख्या निघाली होती. यामुळे मागील दोन महिन्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. जसजशा अँटिजन व आरटीपीसीआर तपासण्या होऊ लागल्या तसतशी शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली व त्यातूनच मृत्युदरही वाढला. येथील आरोग्य यंत्रणेच्या वतीने शासकीय कोविड सेंटरवर अँटिजन व आरटीपीसीआर तपासण्या करण्यात येत आहेत. मागील १५ दिवसांत शहरात बऱ्यापैकी नागरिकांनी संपर्क टाळल्याने शहरात मागील आठवड्यात रुग्णांची चांगलीच संख्या रोडावली आहे, तर ग्रामीण भागात नियमांची पायमल्ली केली जात असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्येत चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
मागील सहा दिवसांतील अँटिजन तपासणीमध्ये ग्रामीण भागात १० ते १५ मे पर्यंत दररोज अनुक्रमे १७, ८, २५, २९, १८, २० असे एकूण ११७ रुग्णसंख्या आढळून आली त्यात शहरात सहा दिवसांची केवळ १० रुग्णसंख्या होती, तर आरटीपीसीआर तपासणीमध्ये १९४ रुग्ण निष्पन्न झाले. त्यापैकी शहरात बोटावर मोजण्याइतके रुग्ण आहेत. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून, गावाकडे जाणाऱ्याची संख्या मात्र चांगलीच रोडावल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
शहरात घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांनी केलेले सर्वेक्षण व तपासणी फायद्याची ठरत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या शहरात घटली आहे. मात्र, तरीदेखील आरोग्य यंत्रणेने गाफील न राहता तपासणी मोहीम सुरू ठेवली पाहिजे, तरच कोरोना आलेख खाली उतरेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
माजलगाव शहरात मागील आठवड्यात संख्या कमी झाली असली तरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करीत एकमेकांशी संपर्क टाळावा.
डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव