बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे बीड जिल्ह्यात रुग्णवाहिका कमी पडू लागल्याचे चित्र आहे. कोरोना व्यतिरिक्त असलेल्या रुग्णांच्या प्रवासासाठी आहे त्या शासकीय रुग्णवाहिकांचा वापर केला जात आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत असून, जिल्ह्यातील विविध शासकीय कोविड सेंटरसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार ३९ रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड व अंबाजाेगाई यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना घेऊन येण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिका कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचेदेखील चित्र होते. त्यानुसार तालुका स्तरावरून रुग्णवाहिका मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी मागणी केली असून, जिल्हाभरातील विविध शासकीय कोरोना सेंटरसाठी ३९ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड व अंबाजोगाई यांना तत्काळ ३९ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अधिग्रहित केलेल्या रुग्णवहिकेचा खर्च नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणार आहे. अतिरिक्त रुग्णवाहिका मिळाल्यानंतर रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.
याठिकाणी देण्यात येणार रुग्णवाहिका
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी केलेल्या मागणीप्रमाणे बीड २, गेवराई २, पाटोदा १, आष्टी २, परळी ५, अंबाजोगाई ६, धारूर २, वडवणी २, माजगाव २, शिरूर का २, केज १, जिल्हा रुग्णालय बीड २, जिल्हा रुग्णालय बीड शववाहिका १, सीसीसी खंडेश्वरी १, शासकीय नर्सिंग कॉलेज लोखंडी सावरगाव अंबाजोगाई सीसीसी १, वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र लोखंडी सावरगाव २, स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव २ अशा मिळून ३९ रुग्णवाहिका अधिगृहित करण्यात येणार आहेत.