अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (जि. बीड) :
कोरोनातून बरे झाल्यानंतर आढळून येणाऱ्या पोस्ट कोविड रुग्णांपैकी म्युकरमायकोसिस या रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या स्वाराती रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. आजपर्यंत ५२ रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ३२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ५ रुग्ण मृत झाल्याची माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाक कान घसा प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले
आहे. या ठिकाणी नाक, कान, घसा विभागाची टीम म्युकरमायकोसिससारख्या आजारावर उपचार करण्यासाठी सक्षम असून, आजपर्यंत ३२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
'पहिल्या लाटेवेळी स्टिरॉईडचा वापर उशिरा सुरू झाला. त्यामुळे याचा वापर तुलनेने अधिक काळजीपूर्वक केला गेला; परंतु दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या उपचारामध्ये स्टिरॉईडचा अतिरेक आणि गैरवापर केल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती ही बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने इतर औषधांच्या वापराचा अतिरेकही यास कारणीभूत आहे का?याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त कले.
ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआयमध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या एमआयआर चाचण्या केंद्रांवर सिटीस्कॅनसाठीच एवढी गर्दी असते की, एमआरआयसाठी वेळ देण्यासही केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल, असे ते म्हणाले.
म्युकरमायकोसिस हा आजार कर्करोगापेक्षाही वेगाने वाढतो. याची लक्षणे सर्वसामान्य असल्याने याचे निदानही लवकर होत नाही. त्यामुळे उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे निदान होऊन रुग्णालयात येईपर्यंत यांच्यातील आजाराची तीव्रता खूप वाढलेली असते. गेल्यावर्षी आलेल्या पहिल्या फेजमध्ये मेंदूपर्यंत हा आजार गेल्याचे फारसे रुग्ण आढळून येत नव्हते. परंतु सध्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या किमान १० रुग्णांच्या मेंदूपर्यत ही बुरशी पोहोचली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी एका रुग्णाचा डोळा काढावा लागला आहे, असे त्यांनी सांगितले.
म्युकरमायकोसिसची लक्षणे
नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे आदी या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत.
डॉ. प्रशांत देशपांडे, विभागप्रमुख. नाक, कान, घसा विभागप्रमुख,
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय.