गेवराई (जि. बीड) : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
नेहा धर्मराज कोरडे (वय ९) व अमृता धर्मराज कोरडे (वय ८) या दोघी शनिवारी आईसोबत कपडे धुण्यासाठी गोदावरी पात्रात गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदी पात्रातील खड्ड्यात बुडू लागल्या. त्यावेळी आईने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खड्डा खोल असल्याने व नदी पात्रात पाणी असल्याने दोन्ही बहिणींना जलसमाधी मिळाली. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले.
वाळू उपशामुळे नदीपात्रात खड्डे
तालुक्यातील गोदा पट्ट्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडलेला आहे. भल्या मोठ्या यंत्राने गोदावरी पात्रातून वाळू उपसा केला जातो. याच यंत्रामुळे गोदावरी पात्रात खड्डे झालेले आहेत. त्यात पावसामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी पाेलीस व महसूल प्रशासनाकडून कारवाया होत असल्या तरी नदी पात्रातील खड्डे वाळू तस्करी सुरू असल्याची साक्ष देत आहेत.
280821\sakharam shinde_img-20210828-wa0032_14.jpg