बीड : कोरोनाच्या काळात इतर जिल्ह्यांत आत्महत्येचे प्रमाण घटल्याची नोंद प्रशासनाकडे आली. मात्र, बीड जिल्ह्यातील आत्महत्येचे आकडे काही कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ६०० आत्महत्या झाल्या आहेत. यावर्षी देखील मार्च अखेरपर्यंत जवळपास १६० आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात मागील वर्षी देखील ६९९ आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली आहे. आत्महत्येची विविध कारणे आहेत. यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या नोंदी आहेत, तर त्याखालोखाल वैवाहिक कलहातून झालेल्या आत्महत्या आहेत. दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपायोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व एक विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेतला तर जिल्ह्यातील वाढता आत्महत्येचा आकडा कमी करण्यास मदत होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय, उद्योग बंद झाले आहेत. दरम्यान, या काळात सर्वांनी एकमेकांना आधार देत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेल्या नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. कितीही संकट आले तरी आत्महत्या हा पर्याय नसून, खचून न जाता जोमाने पुढे जाणे महत्त्वाचे आहे.
संकट माझ्या एकट्यावर नाही...
कोरोनामुळे सर्वांवर संकट आले आहे. मी एकटाच अडचणीत नसून, अनेक मोठे उद्योग व्यवसाय व व्यापार बंद झाले आहेत. ही एक भावनादेखील आत्महत्येचे विचार आपल्या डोक्यातून काढण्यासाठी महत्त्वाची आहे. लॉकडाऊन आहे, त्यामुळे बाहेर पडता येत नाही तर कुटुंबासोबत वेळ घालवा, नवीन काही गोष्टी करता येतील का त्याचा विचार करा. तसेच असे विचार मनात येत असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोला, जेणेकरून आपल्या भावना व्यक्त होतील व विचार बदलतील. तीव्र विचार येत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मत डॉ. यशवंत राजेभोसले यांनी व्यक्त केले आहे.
अशी आहे आत्महत्येची आकडेवारी
२०१९ - ६०६
२०२० - ६९९
२०२१ -१५५