बीड : जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय आहे. १ एप्रिल रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा पाॅझिटिव्हीटी रेट हा १३ टक्के होता. तर आता तोच रेट ३९ वर जावून पोहचला आहे. हे आकडे चिंता व्यक्त करणारे असून नागरिकांनी काळजी घेण्यासह प्रशासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाच्या चाचण्या वाढल्या आहेत. चाचण्या वाढल्याने रूग्णसंख्याही वाढली आहे. परंतू चिंताजनक म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट खूप झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रूग्णसंख्येबरोबरच मृत्यूही होताना दिसत आहेत. ५ एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास ३०० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. सध्या जिल्ह्याचा डेथ रेट हा १.६६ टक्के एवढा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ हजार ३११ लोकांनी कोरोनावर मात केली असून याचा टक्का ८७.३० एवढा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख संशयितांची कोरोना चाचणी
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशयित असलेल्या ४ लाख १२ हजार १०४ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. पैकी ३ लाख ५१ हजार ४२ लाेकांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ६१ हजार ६२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सुरूवातीच्या काळात आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. नंतर ॲन्टिजन कीट मागविण्यात आल्या. त्यामुळे विशेष मोहिम राबवून ॲन्टिजन चाचणी केल्याने यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात टेस्टींग वाढल्या
n गतवर्षी कोरोना चाचणी करणाऱ्या लोकांमध्ये शहरवासीयांचा जास्त समावेश होता. त्यातच प्रशासनाने व्यापारी, दुकानदार यांच्यासाठी विशेष मोहिम राबविल्याने संख्या वाढली होती.
n नंतर काही दिवसांत शहरांपाठोपाठ मोठ्या गावांमध्ये कोरोना चाचणीची मोहिम हाती घेण्यात आली. त्यामुळे ग्रामीणमधील चाचण्यांचा आकडा लाखांच्या घरात गेला.
n आता शहरांसह ग्रामीण भागातील लोकही स्वता:हून पुढे येत कोरोना चाचणी करून घेत आहेत. तसेच पॉझिटिव्ह लोकांसाठी ग्रामीण भागातच कोवीड केअर सेंटर उघडले जात असल्याने व्यवस्थाही होत आहे.
सुचनांचे पालन करावे
रूग्णसंख्या कमी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. उपाययोजनाही केल्या जात आहेत. परंतू लोक काळजी घेत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केल्यास कोरोनाची चेन ब्रेक करण्यात नक्कीच यश येईल, असा विश्वास आहे.
- डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड