इन डेप्थ स्टोरी
सोमनाथ खताळ
बीड : नातेवाईक आणि प्रशासनाच्या वादात एका महिलेच्या मृतदेहाची अवहेलना झाली होती. यात खोलवर गेले असता त्या महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्यानेच मृतदेह नेल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता पोलीस ठाण्यात कसलीही वैद्यकीय तपासणी आणि परवानगी न घेता मृतदेह नेल्याचे शब्द फिर्यादीत आहेत. त्यामुळे आता फिर्यादी नर्सच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
लता सुरवसे (वय ३२, रा. कुंभारवाडी, ता. गेवराई) या महिलेला ती कोरोनाबाधित असल्याने २३ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल केले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना १७ मे रोजी पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची कोरोना चाचणी केली. यात ती निगेटिव्ह आल्याने नातेवाइकांनी डॉक्टर, परिचारिकांना कल्पना देऊन मृतदेह ताब्यात घेऊन गावी नेला. काही वेळात अंत्यसंस्कार होणार तोच प्रशासनाने मृताच्या भावाशी संपर्क साधून मृतदेह परत आणण्यास सांगितले. नंतर बीडला आणून पालिकेने त्यावर अंत्यसंस्कार केले. यात तीन ते चार तास मृतदेहाची अवहेलना झाली. विशेष म्हणजे परिचारिका अर्चना पिंगळे यांनी बीड शहर ठाण्यात जाऊन महिलेच्या पतीसह इतर नातेवाइकांवर मृतदेह पळविल्याची फिर्याद दिली. सर्व चूक प्रशासनाची असताना केवळ दादागिरीमुळे नातेवाइकांवर गुन्हा नोंद झाला होता.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. यात परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांचे जबाब घेण्यात आले आहेत. यात डॉक्टरांच्या जबाबात अँटिजन चाचणी केल्याचे नमूद आहे. तसेच जिल्हाधिकारी, आरएमओ, सीएस यांच्या बोलण्यातूनही चाचणी केल्याचे दिसते. त्यामुळे आयसीएमआरच्या नियमानुसार हा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु, प्रशासनाने केवळ अधिकारांचा वापर करत नातेवाइकांवर गुन्हा नोंद केल्याचे दिसत आहे. असे असताना वैद्यकीय तपासणी न झाल्याची फिर्याद परिचारिका देते. त्यामुळे फिर्याद देणारी परिचारिकाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता याचा निकाल गुरुवारी येणाऱ्या अहवालातून लागणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सीएस, एसीएस व डॉक्टरविरोधात तक्रार
उपचारातील हलगर्जीपणासह अपुऱ्या सुविधांमुळेच माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतरही प्रशासनाने न्यायालय आणि आयसीएमआरच्या नियमांचे उल्लंघन करून मृतदेहाची अवहेलना केली. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व वॉर्ड प्रमुख डॉ. गिरीश गुट्टे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मृताचे भाऊ ॲड. सुभाष कबाडे यांनी दिलेली आहे. ही फिर्याद खारीज झाल्यावर या सर्वांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा अंदाज विधिज्ञांनी व्यक्त केला आहे.
... तर परिचारिकेवरच गुन्हा दाखल
परिचारिका अर्चना पिंगळे यांच्या फिर्यादीत वैद्यकीय तपासणी न केल्याचा उल्लेख आहे; तर डॉक्टरांच्या जबाबात कोरोना चाचणी केल्याचा उल्लेख आहे. यात तफावत आल्याने आता पिंगळे वादात सापडल्या आहेत. खोटी फिर्याद दिली म्हणून भादंविचे कलम १८२ नुसार पिंगळे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काय म्हणतात, जिल्हा शल्यचिकित्सक
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुरुवारी याचा पूर्ण अहवाल तयार होईल. प्रथमदर्शनी काही लोकांच्या जबाबात अँटिजन चाचणी केल्याचे आले आहे. आता यात डेथ बॉडी विल्हेवाट समितीचीही त्रुटी दिसत आहे. यात संपूर्ण अहवाल तयार होताच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
कोट
नातेवाइकांनी दबाव टाकत ॲंटिजन तपासणी करण्यास भाग पाडले. आम्ही कशाला करू मृतदेहाची अवहेलना? यात जी कारवाई केली, त्यात आमचा काहीच हेतू नव्हता.
- रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड