बालवयात मुलांचा शैक्षणिक विकास तसेच व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असताना शाळा बंदमुळे या सर्व ॲक्टिव्हिटी बंद पडल्या. या वयातील मुलांना आपलेसे करून दिले जाणारे शिक्षणही बाजूला पडले. तर ऑनलाइनद्वारे शिकवलेले गळी आणि माथी उतरले नसल्याने शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा ही उणीव भरून काढण्यासाठी शाळा आणि पालकांना मेहनत घ्यावी लागणार आहे. या परिस्थितीमुळे मात्र मुलांच्या शिक्षणाचा टप्पा दोन वर्ष मागे गेला आहे. त्याचा शाळा व्यवस्थापनावरही आर्थिक व सामाजिकदृष्ट्या परिणाम झाला आहे.
-------
गतवर्षी शाळा सुरू होतील, या आशेवर पालकांनी ऑनलाइन शिक्षणाला फारसा प्रतिसाद दिला नाही. तरीही आम्ही व्हिडिओ, ऑनलाइनद्वारे शिक्षण, विविध ॲक्टिव्हिटीवर भर दिला. नर्सरीतील मुलांच्या पालकांनी शाळा सुरू होण्याच्या भरवशावर न राहता पहिलीच्या वर्गासाठी पाया तयार करणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे पुढे अवघड जाणार नाही. - गणेश मैड, संस्थाचालक, बीड.
----------
कोरोनामुळे या वयातील मुलांची शिक्षणात पिछेहाट झाली. मूलभूत पाया विसरले. अभ्यासापासून दूर गेले. त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. सध्या शाळा सुरू होणे शक्य नसल्यातरी नवीन शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षणात अभ्यासाबरोबरच मुलांचा शारीरिक, मानसिक विकास होण्यासाठीच्या योजना राबविणार आहोत.
-नागसेन कांबळे, संस्थाचालक , आष्टी
---------
कोरोनाच्या परिस्थितीमुळे हे वर्षही वाया जाणार आहे. शाळा बंद असल्याने अनेक शिक्षक, शिक्षिका पर्यायी काम, व्यवसाय करत आहेत. संस्थाचालकही शाळेसाठी घेतलेले विविध पूरक कर्ज आणि व्याजामुळे मेटाकुटीला आले आहेत. येत्या वर्षात नर्सरी, केजी, युकेजीचे प्रवेश ऑनलाइन शिक्षणाच्या तत्त्वावर राहतील. -- अमर भोसले, संस्थाचालक, अंबाजोगाई.
-----------------
पालकही परेशान कसा होणार बौद्धिक विकास?
हातात मोबाईल आला की मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना अभ्यासाचा दंडक लावलातरी पालकांना पुरेसा वेळ देता येत नाही. घरात कोंडल्यासारखे वाटत असल्याने खेळायला जाण्यासाठी हट्ट धरतात. चिडचिडही सुरूच असते. आम्ही हतबल आहोत. वर्षभरात शाळेत न गेल्याने मुले शिकलेले विसरले. पुन्हा सराव घ्यावा लागेल.
-- राजेंद्र श्रीमनवार, पालक, बीड.
-----------
माझा पाल्य एलकेजीत आहे. मोबाइलद्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू होते, पण डोके दुखणे व इतर त्रास झाला. नंबरचा चष्मा लागला.
सतत मोबाईल, टीव्हीवरील कार्यक्रमामुळे चिडचिडपणा वाढला. त्यांची दोन वर्षे पिछेहाट झाली. मुले शाळेत गेलेतरी लवकर सुधार होण्याची शक्यता कमीच आहे. -- शीतल सुशील कासट, पालक, बीड.
----------
मुलगा नर्सरीला आहे. कोरोनामुळे शाळा बंद राहणार. रोज ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. पण एवढ्या लहान वयामध्ये कॉम्प्युटर, मोबाईलसमोर बसून डोळ्यांवर परिणाम होतो. ऑनलाईन शिक्षणात लिहिणे, वाचण्याचा सराव कसा होऊ शकेल ? पालकांनी प्रयत्न केले तरी शाळेत शिक्षणासोबतच मिळणारे परिसर ज्ञान व जीवनमान कसे उमगणार हा आमच्यापुढे प्रश्न आहे. - प्रियंका उपरे, पालक, बीड.
---------------
जिल्ह्यातील शाळा २३३
शहरातील नर्सरी टू केजीच्या शाळा -
२०१८-१९ २०१९-२० २०२०-२१
विद्यार्थीसंख्या ३३००० ३२००० ३२०००