लोकमत इम्पॅक्ट
बीड : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना आधार देण्यासह काळजी घेण्यासाठी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सोमवारी ४०३ विद्यार्थिनींची सेवा अधिगृहित केल्याचे आदेश काढले आहेत. या मुली वेळेवर औषधी, पाणी, जेवण देण्यासह समुपदेशनही करणार आहेत. प्रतिदिन ४०० रुपये मानधन त्यांना मिळणार आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या कोराेनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत; परंतु आतमध्ये सेवा व सुविधा मिळत नसल्याच्या नातेवाइकांच्या तक्रारी असल्याने ते स्वत: वॉर्डमध्ये ये-जा करीत होते. याचा परिणाम संसर्ग वाढण्यावर होत होता. नातेवाईक आत जाताना कसलीही काळजी घेत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस संसर्ग वाढत होता. हाच धागा पकडून वॉर्डात नातेवाइकांना जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नातेवाइकांचा रोष वाढला होता. यावर काही नातेवाइकांनी वॉर्डातील रुग्णांची हमी द्या, त्यांची काळजी घ्या, अशी मागणी केली होती. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या द्वितीय व तृतीय वर्षातील ४०३ विद्यार्थिनींना बोलावून घेत ४०० रुपये प्रतिदिन मानधनावर सेवा अधिगृहित करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी या सर्वांना कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जगताप यांनी दिल्या आहेत. या सर्वांची जबाबदारी प्राचार्यांवर सोपविली आहे.
कोट
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून या विद्यार्थिनींवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता नातेवाइकांनी वॉर्डमध्ये जाण्याची गरज नाही. या सर्वांकडून नियमित आढावा घेतला जाईल. नातेवाइकांनी आता काळजी करू नये. काही त्रुटी असतील तर आणखी सुधारणा केल्या जातील. सर्वांनी सहकार्य करावे.
डॉ. आर.बी. पवार, जिल्हा आराेग्य अधिकारी, बीड.
--
काय असेल यांच्यावर जबाबदारी
१) गंभीर रुग्णांची दैनंदिन शुश्रूषा करणे.
२) ऑक्सिजन पुरवठा चालू-बंद याची तपासणी करणे.
३) वेळोवेळी औषधी मिळतात आणि ती घेतली जातात का, याची खात्री करणे.
४) जेवण, पाणी वेळेवर देणे.
५) रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना प्रकृतीबाबत वारंवार माहिती देणे.
६) समुपदेशन करण्यासह मानसिक आधार देणे.
===Photopath===
170521\17_2_bed_11_17052021_14.jpg
===Caption===
१४ मे रोजी लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त. याच वृत्ताच्या अनुषंगाने प्रशासनाने या उपाययोजना केल्या आहेत.