अंबाजोगाई : खाजगी क्लास मध्ये नोकरी करत असलेल्या २१ वर्षीय युवतीला क्लास चालकाने एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी मागणी घातली. युवतीने नकार दिल्यानंतर त्याने व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग केल्याची घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्लास चालकावर विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पिडीतेने दिलेल्या तक्रारी नुसार, बारावी झाल्यानंतर २०१७ साली कल्याण मोरे याच्या रसायन केमिस्ट्री नावाचा खाजगी शिकवणीत दोन महिने नोकर केली होती. त्या दरम्यान कल्याण मोरे याने तिला लग्नाची मागणी घातली. पिडीतेने त्याला नकार दिल्यानंतही तो नेहमीच लग्नासाठी मागणी घालून त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने क्लासची नोकरी सोडून दिली आणि कुटुंबासह लातूरला शिक्षणासाठी गेली. त्यानंतरही कल्याणने लातूरपर्यंत पाठलाग करून आणि सतत मेसेज, कॉल करून पिडीतेला त्रास दिला. काही काळानंतर पीडिता पुन्हा अंबाजोगाईला परतली, तिने मोबाईल क्रमांकही बदलला.
दि. ३ ऑक्टोबर रोजी कल्याणने पिडीतेच्या नातेवाईकाला कॉल करून तिचा मोबाईल क्रमांक विचारला आणि तिच्या बाबत अश्लील बोलला. पिडीतेचा क्रमांक प्राप्त करत गुरुवारी (दि.३१) कल्याणने तिला कॉल केला, परंतु त्याचा आवाज ऐकताच तिने कॉल बंद केला. त्यानंतर त्याने व्हाॅट्सॲपवर सतत अश्लील मेसेज पाठवले. नववर्षाची सुरुवात झाली तरी त्याचे मेसेज सुरूच होते. अखेर त्रासलेल्या पिडीतेने शुक्रवारी (दि.०१) अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून कल्याण मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना. घोळवे करत आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नव्हती.