लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील पंचायत समितीतील कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी उध्दट वर्तन, अरेरावी करत मनमानी पध्दतीने वागतात. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व ऑनलाईन करावे, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
माजलगाव पंचायत समितीकडून १० तारखेच्या आत केव्हाही निवृत्तीवेतन अदा केले जात नाही. यासाठी तरतूद उपलब्ध असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जाते. या कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक सदाशिव जुजगर यांच्याकडे कारभार आहे. अनेकवेळा या विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. येथे कोणीही नीट बोलत नाही. फोन लावला तर उचलत नाहीत. फोन ही आमची वैयक्तिक मालमत्ता आहे का? असे म्हणतात. सेवानिवृत्ती वेतनधारकांकडून कोणताही लाभ मिळत नसल्यामुळे अरेरावीची भाषा कली जाते. जाणुनबुजून सुट्टीच्या आदल्या दिवशी दुपारी बँकेत वेतन जमा केले जाते. आमचे वेतन इतर जिल्हा परिषदांप्रमाणे ऑनलाईन करावे, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचारी हरिभाऊ सोळंके, बी. डी. वाघमारे, बी. बी. गर्जे, एच. एस. सोळंके, पी. के. खोले, शेख मोहमद, एस. एस. पुरबूज यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांनी केली आहे.