अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बसस्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व ऑटोरिक्षा यांचे पार्किंग केले जाते. अगोदरच हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते. त्यातच वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने नागरिक, वाहनधारकांना त्रासदायक होते.
रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा
माजलगाव : तालुक्यातील जायकोचीवाडी गावचा रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. जायकोचीवाडी ते खामगाव पंढरपूर डांबरी रस्ता व पाणंद रस्ता अत्यंत बिकट झालेला आहे. या रस्त्याच्या समस्येबाबत निवेदनही दिले आहे. परंतु, अद्यापही याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेलेले नाही. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढले
बीड : सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बक्षीस लागले, असे मेसेज करून भुलवले जाते. पुन्हा तुमच्या बँकेच्या खात्यातून या क्रमांकावर टॅक्सची इतकी रक्कम भरा. तुम्हाला मोठी रक्कम तत्काळ उपलब्ध होईल, अशा क्लृप्त्या लढवत नागरिकांना गंडविले जात आहे.