शिरूर कासार ( बीड ) : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रदिर्घ काळ समाधी दर्शनापासून दूरावलेल्या हजारो भाविकांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर संत भगवान बाबा व संत भिमसिंह महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. परंपरेप्रमाणे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली ज्ञानेश्वरी विद्यापिठाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांनी सकाळीच संत समाधीचा महाभिषेक केला. तर सायंकाळी शिमोलंघन व शमीपत्र पुजनाचा कार्यक्रम होणार आहे.
कोरोना महामारिचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने घटस्थापनेचा मुहूर्त साधुन मंदिर उडण्यास परवानगी दिली. यामुळे अनेक दिवसांनंतर भाविकांनी मंदिर उघडताच दर्शनासाठी धांव घेतली. आज दसरा मुहूर्तावर हजारो भाविकांनी दर्शनासाठी भगवान गडावर गर्दी केली. यावेळी गडाचे संस्थापक संत भगवान बाबांची व द्वितीय महंत संत भिमसिह महाराज यांच्या समाधीस्थळाची आकर्षक फुलांनी सजावट केली होती. समाधीचे दर्शन घेऊन कृतकृत्य झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमुळे भगवान गड गजबजुन गेला होता. भाविकांनी कोरोना संकट लवकर दूर करण्याचे आणि शेतकऱ्यांना बळ देण्याचे साकडे यावेळी घातले.