बीड : लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य विरोधकांनी केल्याचा आरोप हिंगे यांनी केला असून, चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हिंगे हे डान्स करताना दिसत असून, बाजूला काही महिला आहेत.
याच व्हिडीओखाली आक्षेपार्ह कॅप्शन देऊन हिंगे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. व्हायरल व्हीडीओ जुना १५ वर्षापूर्वीच्या आमच्या घरगुती कार्यक्रमातील आहे. विरोधकांकडून केवळ राजकीय द्वेषभावनेतून तो व्हायरल केला जात आहे, असे अशोक हिंगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.