कॅशलेस व्यवहार वाढले
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अंबाजोगाई शहर व परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपले व्यवहार कॅशलेस करण्यावर भर दिला आहे. यास दुकानदारही प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. शहरातील शिवाजी चौक ते भगवानबाबा चौक या परिसरात ही समस्या सातत्याने भेडसावत आहे. याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक, वाहनधारक, परिसरातील दुकानदारांकडून केली जात आहे.
वाहतूक सुसाट; अपघातांत होतेय वाढ
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्यावरून दुचाकी वाहने सुसाटपणे चालविली जात आहेत. परिणामी, लहान- मोठ्या अपघाताच्या घटना वाढत आहेत. १९ वर्षांखालील अनेक मुले व मुली यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही वेगात वाहन चालवितात. प्रादेशिक परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.