लोकमत एक्सक्लुझिव्ह
बीड : कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यातच सामान्यांनीही कोरोनाच्या भीतीने बाहेर न निघता इतर किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केले. हा प्रकार जिल्हा रुग्णालयातील एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यानच्या ओपीडीतील आकडेवारीवरून समोर आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १ लाख ८६ हजारांनी ओपीडीतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. रुग्णालय स्थलांतराचाही याला फटका बसला आहे.
मार्च २०२० पासूनच कोरोनाची भीती सुरू झाली. कोरोनाची गंभीरता पाहता जिल्हा रुग्णालयातील ओपीडी व आयपीडी विभाग शहरापासून किमान ५ किमी अंतरावर असणाऱ्या आदित्य शिक्षण संस्थेच्या इमारतीत हलविले. एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात नोंद झाला. अगोदरच लॉकडाऊन त्यात कोरोनाच्या भीतीने लोकांनी घराबाहेर पडणेच बंद केले होते. त्यामुळे इतर किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष झाले. हा सर्व प्रकार ओपीडीतील रुग्णसंख्येवरून समोर येतो. २०१९ साली आठ महिन्यांत तब्बल २ लाख ७९ हजार ५९५ लोकांनी उपचार घेतले होते. तर हाच आकडा २०२० मध्ये केवळ ९३ हजार ५६४ एवढा झाला आहे. १ लाख ८६ हजार ३१ ने घटला आहे. यावरून कोरोनाची भीती आणि रुग्णालय स्थलांतराचा फटका याला बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
चाचणीच्या भीतीने अंगावरच दुखणे
सरकारी रुग्णालयात गेल्यावर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे जाणवले की लगेच कोरोनाची चाचणी केली जात होती. त्यामुळे अनेकांनी अंगावरच दुखणे काढले. काहींनी मेडिकलवरून औषधे आणून घरगुती उपचार घेतले; परंतु त्याचा त्रास आता दिसत असून अनेकांना कोमाॅर्बिड आजारांनी घेरले आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून अशा रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात असल्याचे समोर आले आहे.
जुन्या इमारतीत ओपीडी आणावी
शहरापासून जवळपास पाच किमी अंतरावर ओपीडी असल्याने लोकांना १०० रुपये रिक्षाला किराया देऊन जायला परवडत नाही. अनेकदा डॉक्टरही हजर नसतात. त्यामुळे रिकामी चक्कर होऊन आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे लोक दूर जाण्यास टाळतात. हे कमी करण्यासाठी आणि रुग्णांना तत्पर सेवा मिळण्यासाठी ओपीडी जुन्या इमारतीत आणण्याची मागणी होत आहे.
रुग्णसंख्येची वर्षनिहाय आकडेवारी
२८८७८७ - २०१८
२७९५९५ - २०१९९३५६४ - २०२०
----
१८६०३१ ने घटली