बीड : सर्व कर्मचारी नियमित कार्यालयाकडे जात होते. अचानक पायऱ्यांखाली साप दिसला आणि सर्वांची धावपळ सुरू झाली. अरे बापरे... साप निघाला साप.. पळा पळा... असे म्हणत सर्वांनीच धूम ठोकली. अखेर तासाभरात सर्पमित्र आल्यावर नर आणि मादी या धामण जातीच्या सापाला पकडण्यात यश आले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सर्व कर्मचारी कार्यालयात पोहोचत होते. एवढ्यात मागील बाजूस डोळ्याचा वॉर्ड व जिल्हा परिषद औषधी भांडारच्या मध्ये एक प्रयोगशाळा आहे. त्याकडे जाण्यासाठी रस्ता असून, बाजूने गवत उगवलेले आहे. याच अडचणीत साप, उंदीर असे प्राणी आश्रयाला बसतात. शुक्रवारीही अशीच एक जवळपास सहा फूट लांबीची धामण दबा धरून बसली होती. एका कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर ते चांगलेच घाबरले आणि पळत सुटले. नंतर इतर कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र बालाजी गुरखुदे यांना संपर्क केला. त्यानंतर त्याला चपळाईने पकडण्यात आले.
दरम्यान, एक धामण पकडल्यानंतर दुसरी क्षयरोग कार्यालयाजवळ निघाली. तिलाही लगेच पकडण्यात यश आले. हे दोन्ही नर, मादी होते, असे गुरखुदे म्हणाले. या दोन्ही सापांना चपळाईने पकडून इमामपूर परिसरातील जंगलात सोडण्यात आले. त्यानंतर सर्वांनीच मोकळा श्वास घेतला; परंतु दिवसभर या सापांबाबतच चर्चा होती. शनिवारी कार्यालयात जाताना सर्वच कर्मचारी सावध पाऊल ठेवताना दिसले.
040921\04_2_bed_29_04092021_14.jpeg
जिल्हा रूग्णालयात निघालेल्या धामीन जातीच्या सापाला सर्पमित्र बालाजी गुरखुदे यांनी चपळाईने पकडले.