बीड : मकरसंक्रांतीमुळे केवळ दोन दिवस फुललेला बाजार सणानंतर कमालीचा थंडावला. खाद्यतेलाचे भाव तेजीत चढेच राहिले. दैनंदिन वापरातील पामतेलही ११५ रुपये लीटर झाल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर भाज्यांची आवक सर्वसाधारण असून दरात चढ-उतार झाला नाही. फळांच्या बाजारात बदाम, लालबाग आंब्याची आवक अल्प होती. तर कलिंगड, खरबुजांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात किराणा बाजारात मंदीसदृश परिस्थिती होती. मकरसंक्रांतीमुळे केवळ दोनच दिवस ग्राहकी होती. संक्रांत होताच नंतरचे चारही दिवस बाजारात कमालीची मंदी होती. भाजी बाजारातही उत्साह नव्हता. गरजेपुरत्या भाज्यांची खरेदी ग्राहक करत होतेे. फळांच्या बाजारात सफरचंदाला मागणी होती, दरात तेजी होती. गावरान पपई मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या. मेथी, कोथिंबीर, लिंबाची आवक कमी होती.
सफरचंदाचा तोरा कायम
फळ बाजारात सफरचंदाचे भाव १०० ते १२० रुपये किलो होते. विदेशी सफरचंद १५० रुपये किलो होते. मोसंबीचे दर ६० रुपये किलोवर स्थिरावलेले आहेत. तैवान पपई २० रुपये तर गावरान आकारानुसार दर होते. डाळिंबाचे भाव १२० रुपये किलो होते, मात्र दर्जा नव्हता. स्ट्रॉबेरीचा बॉक्स ५० ते ६० रुपयांना होता.
डाळी पडून, तेलाचे वांदे
किराणा बाजारात सोयाबीन तेल १२५, सूर्यफूल १३५ तर पाम ११५ रुपये लीटर होते. कोलम तांदळाचे दर सरासरी ५५ ते ६० रुपये होते. गव्हाच्या दरात मात्र क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली. डाळींचे दर पडून होते. चणाडाळ ६०, तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळीचे भाव ९५ ते १०० रुपये किलो होते.
भाज्या स्वस्तच
गाजराचे भाव २० रुपये किलो होते. कोबी, भेंडी, वांगे, दोडके, वालशेंगाचे दर ३० ते ४० रुपये किलो होते. टोमॅटोचे दर घसरलेले होते. शेवगा ६० रुपये किलो तर पालक, करडी, कांदा पातीचे दर २० रुपये किलो होते. मटारचे भाव २० रुपये किलो होते.
बाजारात फळांची आवक चांगली आहे. मात्र ग्राहकी नव्हती. कलिंगड, खरबुजाची आवक सुरू झाली. संत्रीचे भाव ४० रुपये किलो होते.
- सोहेल बागवान
सणाचे दोन दिवस ग्राहकी होती. नंतर मात्र शांतता आहे. तेलाचे दर वाढत असल्याने खरेदी करणारे ग्राहक चौकशी करतात.
- उमेश सिकची, किराणा व्यापारी
तेल महागल्याने खरेदी करताना बजेट बिघडत आहे. पालेभाज्या स्वस्त आहेत. बटाटे, कांद्याचे दर कमी झाल्याचे समाधान आहे.
--