पुरुषोत्तम करवा
माजलगाव : मागील एक वर्षापासून झालेल्या वातावरण बदलामुळे डाळिंबाच्या फळबागांना मोठा फटका बसला असून, तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो हेक्टरातील फळबागा नष्ट करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फटका बसत आहे. माजलगाव तालुक्यातही तेल्यामुळे शेतकरी जेसीबीच्या साहाय्याने फळबागा तोडू लागले आहेत.
मागील एक ते दीड वर्षापासून दमट वातावरण व इतर कारणांमुळे डाळिंब फळबागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. एक वर्षापूर्वी सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात या रोगामुळे डाळिंब फळबागाचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर मागील सहा महिन्यांत मराठवाड्यात या रोगाने नांगी टाकली. पाहता पाहता पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील हजारो हेक्टर डाळिंबाच्या फळबागा नष्ट कराव्या लागत आहेत.
------
अशी होते तेल्या रोगास सुरुवात
डाळिंबाच्या फळावर सुरुवातीस तेलकट डाग पडतो. नंतर हे फळ फुटते. त्यामुळे त्याला फेकून दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. ही बाग तशीच ठेवल्यास इतर ठिकाणच्या डाळिंबाच्या फळबागांनाही या रोगाची लागण होऊ शकते, तसेच वाऱ्याने हा रोग इतर ठिकाणी पसरतो. हा रोग अनेक डाळिंब फळबागांवर पडल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आलेली बाग मोडावी लागली. परिणामी डाळिंबाच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने डाळिंबाला चांगलाच भाव मिळू लागला आहे.
------
या रोगावर औषध नाही
तेल्या रोग डाळिंबाच्या बागेवर पडल्याने फळबागा तोडल्याशिवाय पर्याय उरत नाही. या रोगावर अद्याप कुठल्याच प्रकारचे औषध उपलब्ध नसल्याने ही बाग तोडण्यामागचे कारण सांगितले जाते.
-------
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब बागेवर तेल्या रोग पडल्यास त्यांनी तत्काळ ही बाग तोडून नष्ट करावी. या शेतीत दुसरे पीक घ्यावे. मी शेलापुरी येथील १२ एकरातील डाळिंबाची फळबाग तेल्या रोगामुळे नष्ट केली. यामुळे मला पन्नास ते साठ लाखांचे नुकसान झाले. या रोगामुळे उत्पादन कमी झाल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. माझ्या सावरगाव व हनुमाननगर येथील डाळिंब फळबागेस चांगला भाव मिळाला आहे.
नितीन नाईकनवरे, डाळिंब उत्पादक शेतकरी, शेलापुरी
060921\purusttam karva_img-20210905-wa0023_14.jpg