शिरुर कासार : तालुक्यातील खोकरमोहा येथे एका ७० वर्षीय महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. हा अपघात आहे की घात, याचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपासून भीमाबाई वसंत मिसाळ ही घरात नव्हती. घरातील लोकांनी शोध घेतला असता, त्यांच्या शेतातील बांधावर वृद्धेचा मृतदेह जळून राख झालेल्या अवस्थेत दिसून आला. बांधावरील गवत पेटविण्याच्या उद्देशाने लागलेल्या आगीपासून वाचण्यासाठी वृद्ध महिला असमर्थ ठरल्याने आगीत सापडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिरूर ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार, बीट अंमलदार भागवत सानप,पोलीस जमादार हरिभाऊ जाधव, पोलीस नाईक हनुमंत साळुंके, सोमीनाथ जायभाये हे घटनास्थळी पोहोचले असून, चौकशी करत आहेत.