सोमनाथ खताळ बीड : पोटच्या तीन मुलांनी उपचारांच्या नावाखाली ८० वर्षीय आईला जिल्हा रूग्णालयात सोडून दिल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड करताच सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलांचा शोध घेतला परंतु त्यांची माहिती मिळाली नाही. या आईला आता माणुसकीचा आधार हवा आहे.सामाजिक कार्यकर्त्यांनी सोनाबाई (नाव बदलले आहे) यांना वृद्धाश्रमात पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सोनाबाई यांचा एक मुलगा शिक्षक, दुसरा सुरक्षारक्षक तर तिसरा टेलरिंगचे करतो. मात्र, तिघांच्या वादात सोनाबाई यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. तिघांनीही आईला सांभाळण्यास असमर्थता दाखविली. त्या आजारी असल्याचे सांगत वारंवार जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
लोकमतने याचे वृत्त दिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेत त्यांची विचारपूस केली. मात्र, त्यांना ऐकायला येत नसल्याने त्यांच्याकडून नीट माहिती मिळाली नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. मात्र तोही बंद असल्याने कार्यकर्तेही हतबल झाले. सामाजिक कायकर्ते तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनी भेट दिली तेव्हा त्यांची एक सून तेथे होती. आपणच त्यांना सांभाळत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र परिचारिकांनी त्या पहिल्यांदाच रूग्णालयात आल्याचे सांगितले. त्यावरून सून खोटे बोलत असल्याचे उघड झाले. आपल्या पतीसह इतर दोघांचा संपर्क क्रमांक देण्यास त्यांनी नकार दिला.न्यायालयातही दावासोनाबाई यांनी काही वर्षांपूर्वी मुले सांभाळत नसल्याने न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर सर्वांनीच पैसे देण्यासह सांभाळ करू, असे न्यायालयाला लेखी दिले होते. सुरूवातीचे दोन वर्षे सर्वांनी पैसे दिले. मात्र, दहा वर्षांपासून त्यांना कसलाच आधार नाही. न्यायालयाचे हे प्रकरण त्यांच्याच एका सुनेने सांगितले.