कडा ( बीड) : बारामती अॅग्रो सहकारी साखर कारखान्यासाठी उसतोडणी करून गावाकडे परतणाऱ्या मजुरांचे ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात एक मजूर जागीच ठार झाला. तर अन्य पाचजण मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास पिंपरी घाटा येथील उतारावर झाला. बाबासाहेब ज्ञानदेव शेकडे ( रा.म्हसोबावाडी, ५५ ) असे मृत मजुराचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील मजुर दरवर्षी ऊसतोडणीसाठी जातात. यंदाच्या वर्षी ते बारामती अॅग्रो येथील सहकारी साखर कारखान्यावर उसतोडणीसाठी सहा महिन्यांपूर्वी गेले होते. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने सर्व मजूर गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गावाकडे ट्रॅक्टरमधून ( क्रमांक एम.एच २३,ए.जी. १२९२) निघाले होते.
दरम्यान, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंपरी घाटा येथील उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात बाबासाहेब ज्ञानदेव शेकडे ( ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हिराबाई बाबासाहेब शेकडे, योगेश बाबासाहेब शेकडे, आप्पासाहेब ज्ञानदेव गिते, कविता आप्पासाहेब गिते, नामदेव बाबुराव शेकडे ( सर्व रा.म्हसोबावाडी ता.आष्टी ) हे पाचजण जखमी झाले. जखमींवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरूणांच्या मदतीमुळे वाचले प्राण अपघाताची माहिती मिळताच प्रा.भागचंद झांजे, भरत झांजे, सोमीनाथ घुमरे, सदाशिव घुमरे, गणपत घुमरे, अरूण घुमरे, बिबीशन घुमरे, कैलास घुमरे, अंगद झांजे, अमोल तळेकर, महादेव घुमरे, संजय घुमरे यांच्यासह ग्रामस्थांनी उसाखाली दबलेले मजुर बाहेर काढले. जखमींना वेळीच मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. तरूणांच्या मदतीने पाच जीव वाचले..
वाचवा, आम्हाला बाहेर काढा जनावरांसाठी चारा, निवाराचे साहित्य घेऊन टॅक्टर निघाला होता. पहाटे अचानक टॅक्टर उलटल्याने मोठा आवाज झाला. वाचवा, अशी तेव्हा वाचवण्यासाठी मजुरांचा आरडाओरड सुरू होता. घटनास्थळी वाचवा, आम्हाला बाहेर काढा या वेदनेने व्याकुळ झालेल्या मजुरांचा टाहो कानावर येत होता.