बीड : भटकंती आणि भीक मागण्याशिवाय पर्याय नसलेल्या पारधी समुदायातील काही कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेहमी फिरत होते. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी या कुटुंबांचे समुपदेशन करुन त्यांच्या मुलांना समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळेत शैक्षणिक प्रवेश दिला.
गेल्या २० वर्षापासून बीड तालुक्यातील वासनवाडी येथे हे कुटुंब राहते. मात्र हक्काचे घर व जागा नसल्यामुळे ते गायरान जमिनीवर झोपडी टाकून राहत आहेत. आपल्याला शासनाने हक्काचे घर देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले अनेक दिवस झाले त्यांचे वास्तव्य होते. या काळात त्यांना नरेगा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरकुल मंजूर करण्याचे आश्वासन दिले; मात्र ते राहत असेलेली वासनवाडी येथील जागा या पारधी कुटुंबाच्या नावे नसल्यामुळे त्यांना घरकुल मंजूर करणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांना घराविना राहावे लागत आहे; मात्र ती गायरान जमीन नावे करून त्या ठिकाणी घरकुलाच्या माध्यमातून घर देण्याची त्यांची मागणी आहे.
या कुटुंबामध्ये १५ सदस्य आहेत, हे कुटुंब गेले काही महिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणीसाठी उपोषण करत आहे. यामध्ये काही मुले देखील आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी मंगळवारी लगेच त्या कुटुंबाना भेटून समस्या जाणून घेतल्या. संबंधित विभागाला घरकुल मिळवून देण्यासाठी आदेशित केले व दीनदयाल उपाध्याय योजनेतून त्यांना जागा मिळवून देण्याचा प्रस्ताव सादर केला. जे उपोषण गेले दीड महिना सुरू होते, ते मडावी यांच्या निर्णयाने एका दिवसात मागे घेण्यात आले. एवढ्या आस्थेवाईकपणे चौकशी करणारा अधिकारी पहिल्यांदा भेटला व आमचे प्रश्न देखील सोडवले, मडावी यांच्यासारखे संवेदनशील अधिकारी प्रशासनामध्ये आहेत, म्हणून आम्हाला न्याय मिळाला असे मत कुटुंबियांनी व्यक्त केले.
उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नाहीयावेळी डॉ. मडावी यांनी या कुटुंबाची विचारपूस केली, त्यावेळी त्यांना लक्षात आले की यामधील एकही मुलगा शाळेत जात नाही. याविषयी त्या कुटुंबाला विचारले असता त्यांनी सांगितले, उत्पन्नाचा काही स्रोत नाही त्यामुळे भीक मागून खावे लगते, तसेच वेळ प्रसंगी चोऱ्या देखील कराव्या लागतात. हे विदारक वास्तव एकून पुढील पिढीवर तरी अशी ही कामे करण्याची वेळ येऊ नये म्हणून मडावी यांनी या मुलांचा समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळेत प्रवेश मिळवून दिला. मुले शाळेत जाणार हे सांगितल्यानंतर पालकांच्या चेहऱ्यावर आनंदासह कृतज्ञतेची भावना दिसून येत होती.
जिल्हाभर दौरा करणार मी स्वत: आदिवासी समाजातील आहे, आज जर हे विद्यार्थी शिकले नाही तर आयुष्यभर भीक मागत फिरतील व वाईट मार्गाला लागतील, त्यामुळे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाभर दौरा करून सर्व पारधी वस्तींवर जाणार आहे. आणि तेथील सर्व विध्यार्थ्यांनी लगेच प्रवेश देणार आहे- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, समाज कल्याण