बीड : एक कोटीची लाच मागणाऱ्या हरिभाऊ खाडेच्या प्रकरणात एसआयटीचे तपास अधिकारी बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला बाेलावले होते. परंतू गोल्डे यांच्याकडून चौकशीला सामोरे जाण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे संशय वाढतच चालला आहे. आता एसीबीकडून सोमवारी आणखी एक पत्र पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिले जाणार आहे.
जिजाऊच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी एसआयटी आहे. याचे तपास अधिकारी बीडचे डीवायएसपी गोल्डे, प्रमुख अपर अधीक्षक सचिन पांडकर आहेत. याच गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी सहायक तपास अधिकारी पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने तब्बल १ कोटीची लाच मागितली होती. यातील पाच लाख रूपये घेताना खासगी व्यक्ती कुशल जैन याला बेड्या ठोकल्या होत्या. तर खाडे आण सहायक फौजदार आर.बी.जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. एसीबीकडून या कोटीमध्ये कोणाकोणाचा वाटा आहे? याचा तपास करण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बाेलावले होते. यामध्ये अपर अधीक्षक पांडकर यांचा जबाबही घेण्यात आला आहे. परंतू डीवायएसपी गोल्डे यांनी अद्यापही एसीबीला जबाब दिलेला नाही. गोल्डे एसीबीसमोर हजर का होत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, एसआयटीचे प्रमुख अपर अधीक्षक सचिन पांडकर यांना फोनवरून संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
गोल्डे यांच्याविरोधात ठेवीदारांचा रोष
डीवायएसपी गोल्डे यांनी जिजाऊच्या प्रकरणात काहीच तपास केला नाही. मुख्य आरोपी बबन शिंदे याच्या तपासासाठी एलसीबीसह पाच पथके आहेत. परंतू हे केवळ इकडे तिकडे फिरून परत येत आहेत. अद्याप यांना शिंदे सापडलेला नाही. त्यातच लाचेची कारवाई झाल्याने जिजाऊच्या ठेविदारांनी एसआयटीसह पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केले होते. शुक्रवारी तर एका ठेविदाराने उपअधीक्षक गोल्डे यांच्यासमोरच प्रशासन मॅनेज असल्याचे विधान केले होते. त्यानंतर आता ज्ञानराधा मल्टीस्टेटचा तपासही गोल्डे यांच्याकडेच देण्यात आला आहे. त्यांच्याकडून न्याय मिळेल, असा विश्वास नसल्याने ठेविदारांनी गोल्डे यांच्याकडील तपास काढून घेत तो आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी केली होती.
हरिभाऊ खाडे प्रकरणात उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे यांना चौकशीसाठी हजर करा, असे पत्र पोलिस अधीक्षकांना दिले होते. परंतू त्यांनी वेळ मागितला होता. याला अनेक दिवसांचा कालावधी उलटूनही गोल्डे यांनी अद्याप जबाब दिलेला नाही. आता सोमवारी पुन्हा एकदा पोलिस अधीक्षकांना स्मरणपत्र दिले जाणार आहे.
शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी बीड