मुंबई - भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त सावरगाव घाट जोशपूर्ण भाषण केलं. मी आता राष्ट्रीय मंत्री असल्याचं सांगत पक्ष वाढीसाठी आपली जबाबदारी वाढल्याचंही पंकजा यांनी म्हटलंय. कोरोनामुळे आजच्या दसऱ्या मेळाव्याला गर्दी नाही, पण गर्दीचे विक्रम मोडणार दसरा मेळावा आपण घेऊ, एक दिवस शिवाजी पार्क मैदानावर आपण दसरा मेळावा भरवणार असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. पंकजा यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करत दाद दिली.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांसह भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. खूप दिवसानंतर पंकजा यांनी जाहीर भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये संचार निर्माण केला आहे. कोरोनामुळे आज मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन होत आहे. पण, पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सपासून 4 ते 5 किमीपासून लोकं चालत इथपर्यंत येत आहेत. लोकांचे हेच प्रेम मला काम करण्याची प्रेरणा देते, असे पंकजा यांनी म्हटलं.
सत्ता असो किंवा नसो, पद असो किंवा नसो पण तुमच्या सर्वांच प्रेम मला मिळतंय. आता, मंत्रालयाच्या चकरा कमी करुन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचंय. कोरोनामुळे यंदा माणसांची गर्दी कमीय, दरवर्षी 8-10 लोकांच्या गर्दीत मला भाषण करायची सवय आहे. मात्र, भगवाना बाबांच्या डोळ्यात मला ती गर्दी दिसली. यंदा दरवर्षीप्रमाणे मेळावा होऊ शकला नाही, पण आपल्या मेळाव्याची एक वेगळीच शक्ती आहे. पुढच्यावर्षी आपण याचेही रेकॉर्ड मोडू, एकदा आपल्याला शिवाजी पार्कसुद्ध भरवायचंय. मुंढेसाहेब जिल्हा परिषदलाही उभे नव्हते. भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, असं स्वप्नातही वाटत नव्हतं, त्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी भाजपात राजकीय जीवनाची सुरुवात केली. तेव्हा, शिवाजी पार्कमध्ये बसलेल्या मुंडेसाहेबांनी म्हटलं होतं. एक दिवस मी या शिवाजी पार्कवर सभा घेईन. म्हणून आज मी सांगते, एक दिवस शिवतिर्थावर दसरा मेळावा घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असे पंकजा यांनी म्हटले.
प्रितम मुंडेंना ताप, कोरोनाची चाचणी झाली
प्रितम मुंडे आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. प्रितमताईंना ताप आलाय, घसात कफ झालाय, काय झालंय माहिती नाही. प्रितमताईंनी कोरोनाची चाचणी केलीय. म्हणून त्या आज इथं आल्या नाहीत, असं पंकजा यांनी सांगितलं. तसेच, दरवर्षी प्रितमताईंची रॅली असते अन् मी हेलिकॉप्टरने येत असते. पण, आज माझा एक हात मोडल्यासारखं मला वाटतंय. आज प्रतिमताई इथं नाहीत, पण आपण ठरवल्याप्रमाणे त्याही ऑनलाईन आपला मेळावा पाहत असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वजण हा दसरा मेळावा पाहत असल्यचंही त्यांनी म्हटलं.
निर्णय घेण्यास मी खंबीर
माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा. अशा शब्दात अफवा पसरविणाऱ्यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
लोकांपासून दुरावले नाही
मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी नाव न घेता टीका केली.
'असिमन्टमॅटिक' कार्यकर्ते घातक
आ. नमिता मुंदडा यांच्यावतीने भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुंडे यांनी या सर्व चर्चेवर भाष्य करत त्यांच्या पक्षांतराच्या अफवा पसरविणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. मुंडे म्हणाल्या, कोरोनात असिमन्टमॅटिक असलेले रुग्ण जसे समाजात साथ फैलावासाठी घातक ठरतात. तसे राजकारणात 'असिमन्टमॅटिक' कार्यकर्तेही घातक आहेत. अशा कार्यकर्त्यांची चांगली पारख आपल्याला झाली आहे. भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त कसा करायचा, याचा विचार मी केला आहे असा इशाराही मुंडे यांनी यावेळी उपद्रवी कार्यकर्त्यांना दिला.