अंबाजोगाई : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डेमुक्ती’साठी सांगितलेली १५ डिसेंबरची डेडलाईन काल संपली. मात्र रस्त्यांची दुर्दशा अजूनही तशीच असून अंबाजोगाईत एकाचा खड्डे चुकवताना बळी गेला. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडला.
खड्ड्यांमुळे राज्यभरातील रस्त्यांची झालेली चाळणी आणि वाढते अपघात, त्यात निष्पापांचा नाहक जात असलेला बळी यामुळे वातावरण तापल्यामुले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करून अशी घोषणा केली होती. काल या आश्वासनपूर्ततेची डेडलाईन संपली तरी देखील बहुतांशी रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. मात्र, पाटील यांनी प्रमुख राज्य मार्गावरील ९७ टक्के तर प्रमुख जिल्हा मार्गावरील ८३ टक्के खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती काल दिली. बीड जिल्ह्यासहित इतर अनेक जिल्ह्यातील मार्गांची स्थिती दयनीय असताना पाटील यांनी व्यक्त केलेला दावा संताप आणणारा आहे. राज्यमार्गावरील ९७ टक्के खड्डेमुक्तीचा दावा करून २४ तासही उलटत नाहीत तोच चंद्रकांत पाटील यांनी केलेला दावा किती फोल आहे याची प्रचीती अंबाजोगाईकरांना आली. आज पहाटे रस्त्यावरील खड्डे चुकवताना इस्माईल छोटे खां पठाण (वय ४०) रा. साकुड, ता. अंबाजोगाई या मजुराचा नाहक बळी गेला.
इस्माईल पठाण हे अंबाजोगाई नजीक अंबासाखर परिसरातील एका वीटभट्टीवर कामाला होते. एका सहकाऱ्याचे पोट दुखत असल्याने त्यांनी त्यास एपे रिक्षा (एमएच २३ एक्स २६४१) मध्ये बसवून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले आणि एकटेच रिक्षा घेऊन माघारी वीटभट्टीकडे निघाले. पाण्याची टाकी ते अंबासाखर दरम्यान आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास एका रोपवाटिकेसमोरील खड्डा चुकवताना त्यांचा रिक्षा पलटी झाला आणि इस्माईल पठाण रिक्षाखाली दबले गेले. बेशुद्धावस्थेत त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास जमादार प्रकाश सोळंके हे करत आहेत. दरम्यान, आणखी किती बळी गेल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजविले जाणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.