लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : म्हशीला गवत आणण्यासाठी राजेवाडी बंधाऱ्यावरून पुनंदगावकडे जाणारा एक ५० वर्षीय व्यक्ती पुराच्या पाण्यात पडून वाहून गेला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान, बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे. तर शिंपेटाकळी येथे गायी तर सादोळ्यात ९०० कोंबड्या दगावल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील राजेवाडी येथील सतीश आश्रुबा पोटभरे हे राजेवाडी बंधाऱ्यावरून पुनंदगावकडे आपल्या म्हशीला चारा आणण्यासाठी जात होते. यावेळी पुराच्या पाण्यामुळे बंधारा तुडुंब भरून वाहत होता. यावेळी पोटभरे यांचा अचानक तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात पडले व पाहता पाहता वाहून गेले. तहसीलदार वैशाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित व्यक्तीला शोधण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण केले होते.
दरम्यान, तालुक्यातील सादोळा येथील दिलीप सोळंके यांच्या शेतात कुक्कुटपालन केंद्र आहे. याठिकाणी १२०० कोंबड्या तर ५० शेळ्या आहेत. या केंद्राशेजारीच असलेल्या गोदावरी नदीला पूर आल्याने नदीचे पाणी कुक्कुटपालन केंद्रात शिरल्याने ९०० कोंबड्या मंगळवारी रात्री मरण पावल्या. यावेळी तीनशे कोंबड्या व सर्व शेळ्यांना बाहेर काढण्यात यश आल्याने त्या बचावल्या.
शिंपेटाकळी येथील पंढरीनाथ कुंडकर यांनी शेतात बांधलेल्या दोन गायी व दोन बैल सिंधफणा नदीला पूर आल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
080921\purusttam karva_img-20210908-wa0036_14.jpg~080921\purusttam karva_img-20210908-wa0031_14.jpg